शेताकडे निघालेल्या चौघा शेतकऱ्यांना भरगाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने ठोकल्यामुळे घडलेल्या भीषण अपघातात दोन शेतकरी वाहनाखाली चिरडून जागीच ठार झाल्याची तर अन्य एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील गोधोळी गावानजीच्या धारवाड -रामनगर राज्य महामार्गावर काल मध्यरात्री घडली.
महाबळेश्वर शिंदे (वय 65) आणि पुंडलिक रेडेकर (वय 72, दोघे रा. गोधोळी) अशी अपघातात ठार झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. अपघातात पुंडलिक यांचा मोठा भाऊ कृष्णा रेडेकर (वय 74) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. चौथ्या किरकोळ जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नांव मंजुनाथ कागिनकर (वय 47) असल्याचे सांगण्यात आले. याबाबतची माहिती अशी की, गोधोळी गावातील उपरोक्त चार शेतकरी ऊसाला पाणी सोडण्यासाठी काल गुरुवारी मध्यरात्री आपल्या शेताकडे पायी निघाले होते. धारवाड रामनगर राज्य महामार्गावरून गावाजवळच्या शेताकडे जाणाऱ्या या शेतकऱ्यांना एका अज्ञात भरधाव वाहनाने मागून धडक दिली. परिणामी महाबळेश्वर व पुंडलिक हे दोघे शेतकरी त्या वाहनाखाली सापडून जागीच ठार झाले तर कृष्णा हा शेतकरी गंभीर जखमी झाला. सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून मंजुनाथ कागिनकर हा शेतकरी अपघातातून बचावला त्याला किरकोळ दुखापत होण्यापलीकडे कांही झाले नाही.
या अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार अरविंद पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य हाती घेतले. पोलिसांना अपघाताची माहिती देण्याबरोबरच त्यांनी जखमी शेतकऱ्यांना त्वरेने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था केली. दरम्यान पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून ठार झालेल्या शेतकऱ्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर सरकारी हॉस्पिटलमध्ये हलविले. नंदगड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.