Tuesday, January 14, 2025

/

MOST LIVEABLE & LOVEABLE’ सिटीचे स्वप्न : राजकुमार टोपाण्णावर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघातील निर्णायक लिंगायत मतदारांचा विचार करून आम आदमी पक्षाने लिंगायत समाजातील नेत्याला उमेदवारी दिली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून बेळगावमधील रखडलेल्या विकासकामासंदर्भात तसेच भ्रष्टाचारासंदर्भात आवाज उठविणारे राजकुमार टोपाण्णावर हे आम आदमी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उत्तर मतदार संघातून निवडणूक लढवीत आहेत. आपल्याला भाजपमध्ये संधीच नव्हती कारण भाजपमध्ये मक्तेदारी चालते, तेथे सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंमत दिली जात नाही आणि भाजप हा नव्याने उदयाला येणारा काँग्रेस आहे, अशी टीका राजकुमार टोपाण्णावर यांनी केली.

आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना त्यांनी आपल्याला जनतेने संधी दिल्यास बेळगावचा विकास ‘MOST LIVEABLE & LOVEABLE’ सिटीत करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्याला लिंगायत समाजातील उमेदवार म्हणून नव्हे तर आपण गेलेल्या कामाची पोचपावती म्हणून पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून हि संधी दिली आहे. चार जिल्ह्यांचे विभागीय अध्यक्षपद भूषवतना आपल्याला असे जाणवले कि, लोकशाहीच्या अधिकारानुसार प्रत्येक समाजाला संधी मिळाली पाहिजे. बेळगावमध्ये विविध भाषेचे, जातीचे, धर्माचे लोक राहतात. त्या सर्वांना सामान संधी मिळाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.Raju topannavar

भाजप असो किंवा काँग्रेस या पक्षांनी केवळ जातीय, भाषिक राजकारण करून जनतेच्या भावनेचा खेळ केला. यादरम्यान बेळगावचा विकास मात्र दुर्लक्षित राहिला. राष्ट्रीय पक्षांचे विभागवार नेते ‘फिक्स’ आहेत. दक्षिण मतदार संघात सर्वाधिक मतदार असलेले मराठा समाजातील मतदार, विणकर समाजातील मतदार यासह विविध समाजातील मतदारांचे प्राबल्य असूनही राष्ट्रीय पक्षांनी सर्वसमावेशक विचार न करता केवळ एकाच उमेदवाराला संधी देण्यात धन्यता मानली. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संधी मिळावी, बेळगावमधील प्रत्येक समाजातील जनता एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने राहावी, शिवाय बेळगावमधील प्रत्येक जनतेचा खऱ्या अर्थाने विकास व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे टोपाण्णावर म्हणाले.

जनतेने आपल्याला बहुमत दिल्यास बेळगावमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासावर आपण भर देणार आहे. गेल्या ५ वर्षात कोट्यवधी निधी आला. स्मार्ट सिटी, मुख्यमंत्री निधी, अमृत निधी यासारख्या अनेक निधीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये आले. मात्र दूरदृष्टीकोन नसलेल्या लोकप्रतिनिधींमुळे रस्ते, गटारी आणि पथदीप याव्यतिरिक्त कोणत्याच गोष्टीचा विकास झाला नाही. शिवाय झालेला विकास देखील निकृष्ट दर्जाचा असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. रस्ते, पथदीप आणि गटारी म्हणजे विकास नव्हे असे मत त्यांनी व्यक्त केले.

बेळगावमधील कमकुवत नेतृत्वामुळे अनेक प्रोजेक्ट हुबळी, धारवाड ला गेले. यासाठीच आपण बेळगावमध्ये स्टार्टअप, स्पर्धात्मक परीक्षांसाठी ‘रिसोर्स लर्निंग सेंटर’ स्थापन करणार असल्याचे ते म्हणाले. आज अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणी असूनही बेळगावमध्ये संधी नसल्यामुळे परगावी जाऊन शिक्षण घेत आहेत.

अशा विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. याचबरोबर युवा वर्ग, महिला वर्गासाठी विविध सोयी-सुविधा, क्रीडा क्षेत्राचा विकास, कम्युनिटी हॉल, बाजारपेठेचे विकेंद्रीकरण, शहराच्या मध्यवर्ती भागाचा विकास, निवासी आणि व्यावसायिक क्षेत्राचा विकास आणि योग्य पद्धतीचे वर्गीकरण, रेट्रो सिटी कन्सेप्ट यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला राबवायच्या आहेत. येथील विद्यमान लोकप्रतिनधींमुळे बेळगावचा विकास खुंटला असून १९७० मधील परिस्थिती शहरातील अनेक भागात आजही अनुभवायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगावमधील राजकारणी आणि राष्ट्रीय पक्ष हे जनतेला भाषिक, धार्मिक प्रश्नांमध्ये अडकवतात. विकासाचा मुद्दा भरकटवण्यासाठी विविध स्पर्धा-मेळाव्यांचे आयोजन करतात. बेळगावच्या नेत्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर बेळगाव हि राज्याची दुसरी आर्थिक राजधानी बनू शकली असली. मात्र जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष करून बेळगावचा विकास मागे राहिला. आपण या निवडणुकीत विजयी झालो किंवा पराभूत झालो तरीही आपण आपले कार्य निरंतर सुरूच ठेवणार असल्याचे राजकुमार टोपाण्णावर म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.