एपीएमसी आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत कार गाडीसह 1 लाख 23 हजार 933 रुपये किमतीची दारू जप्त करण्याबरोबरच एकाला अटक करण्यात आल्याची घटना काल रविवारी बी. एस. येडीयुरप्पा मार्गावर घडली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव अनिलकुमार लवप्प हज्जी (वय 53, मूळ रा. हरिजनवाडी एकसंबा ता. चिक्कोडी, सध्या रा. शिवाजीनगर बेळगाव) असे आहे. शहरातील जुना पी. बी. रोड -येडीयुरप्पा मार्गावरून एका अल्टो कारगाडीतून मद्याच्या अर्थात दारूच्या मोठ्या साठ्याची बेकायदा वाहतूक केली जाणार असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक आणि शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसह सापळा रचला.
तसेच बी. एस. येडीयुरप्पा मार्गावर संबंधित मारुती अल्टो कार (क्र. केए 22 पी 3038) अडवून तिची झेडती घेतली. या झेडतीमध्ये पोलिसांना बेकायदा वाहतूक करण्यात येत असलेल्या विविध कंपन्यांच्या 1 लाख 23 हजार 933 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या कारगाडीत दडवून ठेवल्याचे आढळून आले.
सदर दारू साठ्यासह अल्टो कार जप्त करण्याबरोबरच पोलिसांनी अनिलकुमार याला अटक करून गुन्हा नोंदविला आहे. एपीएमसी आणि शहापूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी त्यांना शाबासकी दिली आहे.