Friday, January 10, 2025

/

मानवी विकास ठरतोय धोकादायक : मानवी वस्तीत पुन्हा वन्यजीवांचा वावर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : मार्च महिन्यात उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागतात. याचदरम्यान अनेक वन्यजीव पाण्याच्या शोधात भटकंती करतात. जंगलातील पाण्यचे स्रोत आटल्यामुळे अनेक वन्यजीव पाण्याच्या शोधात नागरी वस्त्यांमध्ये शिरतात. अलीकडे बेळगावमध्ये उन्हाळ्याव्यतिरिक्त इतर वेळीही अनेक वन्यजीव नागरी वस्तीमध्ये शिरलेले आढळून आले आहेत. बेळगावमध्ये सातत्याने वन्यजीवांचा वावर असल्याचे निदर्शनात आले आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी भर शहराच्या मध्यभागी बिबट्याने धुमाकूळ घातला. महिनाभर बिबट्याला शोधण्यासाठी अरण्य खात्याला तसेच प्रशासन आणि पोलीस विभागाला कंबर कसून कसरत करण्याची वेळ आली. याचदरम्यान अनेक ठिकाणी इतर वन्यपशूदेखील निदर्शनात आले. बुधवारी (२८ फेब्रु.) पुन्हा एकदा देसूर येथील नागरी वस्तीत गवि रेड्याचे दर्शन झाले असून भर वस्तीत अचानकपणे शिरलेल्या गवि रेड्यामुळे येथील नागरिकांची घाबरगुंडी उडाली. मंगळवारी (२७ फेब्रु) देखील येळ्ळूर भागात भेकर आढळून आले होते. यावेळी स्थानिकांनी भेकराला सुरक्षितपणे पकडून वखात्याच्या अधिकाऱ्यांकडे सोपविले होते.

बेळगावमधील खानापूर तालुक्याच्या सीमेवर वनराई आहे. या भागात सर्रास वन्यप्राण्यांचा वावर दिसून येतो. परंतु आता शहराच्या सीमेवर देखील असे वन्यजीव आढळून येत असल्याने नागरिकांची घाबरगुंडी तर उडतच आहे मात्र वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही तितकाच ऐरणीवर येत आहे. जंगलांमध्ये मानवाचे होत असलेले अतिक्रमण, बेसुमार वनराईची नासधूस या कारणांमुळे वन्यजीव जंगल सोडून मानवी वस्तीत शिरत आहेत. नैसर्गिक अधिवासात वन्यजीवांच्या वस्तीत मानवाने अतिक्रमण केल्यानेच हि परिस्थिती वन्यजीवांवर ओढवली असल्याचे स्पष्ट आहे. यासाठी वनखात्याने ठोस पाऊले उचलून उपाययोजना करणे आवश्यक आहे.

शहरीकरणाच्या नावाखाली होत असलेल्या जंगलाच्या ऱ्हासामुळे जंगली प्राण्यांचा वावर शहराच्या दिशेने वाढत आहे, हि चिंतेची बाब आहे. मागील काही महिन्यात शहरातील जाधव नगर परिसरात आढळून आलेल्या बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केला. मात्र सुदैवाने ती व्यक्ती बचावली. मात्र मानवी वस्तीने शहरीकरणाच्या नावाखाली जंगलांचा ऱ्हास करणे थांबविले नाही तर वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष अधिक बळावेल,यात तिळमात्र शंका नाही.

Wild animals
Photo : दोन गवी रेडे बुधवारी सकाळी देसुर गावात आले होते

जगण्याचा अधिकार केवळ माणसालाच नाही तर प्राण्यांनाही आहे. यासाठीच वन्यजीव संरक्षण कायदाही आहे. मात्र या कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी फारशी होत असल्याचे दिसून येत नाही. विकासाच्या नावावर जंगल, शेती, वनराईची बेसुमार कत्तल करण्यात येत आहे. निसर्ग संपदेचा विध्वंस सुरु आहे. यामुळे केवळ वन्यजीवच नाही तर दुर्मिळ वनराईदेखील नष्ट होत चालली आहे.

‘ग्लोबल वॉर्मिंग’ सारखा फटका गेल्या कित्येक वर्षांपासून डोके वर काढू लागला आहे. यामुळे विकासाच्या आणि शहरीकरणाच्या नावावर होत असलेला हा सावळा गोंधळ वेळीच थांबवून निसर्गाने दिलेल्या या दानाचे योग्य संवर्धन करणे, हि काळाची गरज आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.