बेळगाव शहरातील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळाचे अधिकारी व एल अँड टी कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत येत्या शुक्रवार दि. 24 मार्च रोजी बेंगलोर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर बैठकीला बेळगावचे दोन्ही आमदार उपस्थित राहणार असून बैठकीमध्ये बेळगावच्या पाणीटंचाईवर तोडगा काढला जाणार आहे. दरम्यान, बेळगावची पाणीटंचाई उद्भवण्यास कॅन्टोन्मेंट बोर्ड कारणीभूत असल्याचा आरोप बेळगाव दक्षिणचे आमदारांनी केला आहे. यासाठी बेंगलोर मधील बैठकीनंतर आमदार अनिल बेनके, खासदार मंगला अंगडी खासदार इराण्णा कडाडी यांना सोबत घेऊन आपण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॅन्टोन्मेंट हद्दीतून 4 कि.मी. लांबीची जलवाहिनी घालण्यासाठी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून परवानगी हवी आहे. वर्षभरापासून त्यासाठी पाठपुरावा सुरू असला तरी अद्याप परवानगी मिळालेले नाही.
या उलट परवानगी देण्यासाठी दरवर्षी 60 लाख रुपये शुल्क भरण्यास सांगण्यात आले आहे त्यामुळे संरक्षण मंत्र्यांना भेटूनच या समस्येवर तोडगा काढला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.