अनगोळ येथील इंदिरानगर, रेल्वे मार्गाशेजारील शिवशक्तीनगर आणि परिसरात निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई युद्धपातळीवर दूर करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी केली जात असली तरी अनगोळ येथील इंदिरानगर, रेल्वे मार्गाशेजारील शिवशक्तीनगर आणि परिसरात पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ पडला आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून या भागात पिण्याच्या पाण्याचा व्यवस्थित पुरवठा होत नाही.
अलीकडे कांही दिवसांपासून तर इंदिरानगर, शिवशक्तीनगर परिसरातील नळांना स्वयंपाकापुरते देखील पिण्याचे पाणी येत नसल्यामुळे येथील रहिवाशांवर गंभीर परिस्थिती ओढवली आहे. सध्या येथील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी धडपडत आहेत.
पाण्याच्या भीषण टंचाईमुळे येथील नागरिकांना पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यासाठी प्रति टँकर पाण्यासाठी 450 ते 500 रुपये किंमत मोजावी लागत आहे.
पाणी टंचाई बाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करून देखील अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात येत नसल्यामुळे नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तरी आमदार आणि नूतन महापौरांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अनगोळ इंदिरानगर, शिवशक्तीनगर परिसरातील पाणी टंचाई दूर करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.