बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये आले असून निवडणुकीसंदर्भात तयारी सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मतदार यादी पडताळणीसाठी ॲप विकसित करण्यात आले असून आता मतदार यादीची पडताळणी नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल या संकेतस्थळावर किंवा वोटर हेल्पलाईन या ॲपद्वारे करता येणार आहे.
त्यामुळे मतदारांनी वेळीच मतदार यादी पडताळून घ्यावी, चुका दुरुस्त करून घेण्याबाबत आवाहन आयोगाने केले आहे.
तक्रार, आचारसंहिता भंग किंवा रॅली, सभा आणि समारंभाला परवानगीसाठी देखील संकेतस्थळ विकसित केले आहे. त्याद्वारे मतदान प्रक्रिया अधिक सुलभपणे पार पाडण्याचा उद्देश आहे.
त्याशिवाय कच्ची मतदार यादी तयार करत त्यावर आक्षेप मागविले होते. अंतिम यादी तयार असून याबाबतची शहानिशा मतदारांनी करून घ्यावी, असे आवाहन निवडणूक विभागाकडून केले आहे.
गेल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाचे तीन सदस्यीय पथक कर्नाटक दौऱ्यावर होते. सदर पथकाने निवडणूक तयारीचा आढावा घेत मतदार यादी पडताळणीबाबत जागृतीसाठी ॲपला प्रसिद्ध द्यावी, असे आवाहन केले आहे. त्यानुसार आयोगाकडून ॲपची माहिती संकेतस्थळी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या ॲपद्वारे मतदार यादीची शहानिशा करून घेता येईल. राज्याची विधानसभा निवडणूक मार्चअखेर वा एप्रिलमध्ये घोषित होण्याची शक्यता असून मे महिन्यांत निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी मतदार यादीत चूका राहू नये, या उद्देशाने मतदाराने मतदार यादी पडताळणी करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.