वडगाव येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मात्र गेल्या 15 दिवसापासून नळाला पाणीच येत नसल्यामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना स्वखर्चाने दररोज चार टँकर पाणी पुरवण्याद्वारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी दिलासा मिळवून दिला आहे.
एल अँड टी कंपनीच्या नियोजनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सातत्याने बसत आहे. गळती निवारण्यासाठी शहर व उपनगरातील विविध भागात पाणीपुरवठ्यात कांही काळ व्यत्यय निर्माण झाला होता. मात्र वडगावमध्ये गेल्या तब्बल 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झालेला नाही. परिणामी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नळांना स्वयंपाकापुरते देखील पाणी येत नसल्यामुळे विशेष करून येथील गृहिणीवर्ग अतिशय त्रस्त झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडत असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, वडगाव येथील पिण्याच्या पाण्याची समस्या आणि त्यामुळे तेथील रहिवाशांचे होणारे हाल याची माहिती मिळताच महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे नेते रमाकांत कोंडुसकर त्यांच्या मदतीला धावले आहेत. कोंडुसकर यांनी वडगावमधील रहिवाशांसाठी स्वखर्चाने दररोज चार टँकर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.
या पद्धतीने थोडी का होईना पिण्याच्या पाण्याची सोय झाल्यामुळे वडगाव मधील नागरिकांमध्ये विशेष करून महिला वर्गात समाधान व्यक्त होत असून त्या रमाकांत कोंडुसकर यांना दुवा देत आहेत.यावेळी समितीच्या शिवानी पाटील ,सुमित मोरे, बाबू नावगेकर आदी युवक उपस्थित होते.तब्बल 15 दिवसानंतर गल्लीत पिण्याचे पाणी आल्यामुळे पाणी घेण्यासाठी टँकर मागे महिलांची गर्दी झाल्याचे चित्र आज वडगाव परिसरात पहावयास मिळत होते.