बेळगाव लाईव्ह : बेकायदेशीरपणे मद्यविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकून ७,५२,२६० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. उद्यमबाग पोलिसांच्या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याजवळील एक वाहन देखील जप्त करण्यात आले आहे.
मजगाव परिसरात पाचव्या रेल्वे गेटनजीक एका वाहनातून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे खडेबाजार पोलीस स्थानकाच्या उपविभागाचे एसीपी अरुणकुमार कोलुरू यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यमबाग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आर. एस. बिरादार आणि त्यांचे सहकारी जी. एन. गर्लहोसूर, टी. सी. कुंचणूर, ए. एम. कांबळे, भरमा करेगार, सी. एस. हंचनाळ, आनंद चिदानूर आदींच्या पथकाने हि कारवाई केली आहे.
या कारवाईत परशराम भाऊराव पट्टेकर (वय : ३१, रा. होसूर बसवाण गल्ली, खासबाग, शहापूर) या व्यक्तीला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरु आहे. या कारवाईत सहभागी असलेल्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कौतुक केले आहे.