वैयक्तिक स्वार्थापोटी मंडोळी रोड येथील एक विशाल वृक्ष गेल्या गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आला. या कृतीच्या निषेधार्थ तसेच तोडलेल्या झाडांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बेळगाव सोशल नेटवर्कतर्फे उद्या रविवार दि. 26 मार्च रोजी सकाळी ‘चिपको चळवळ’ हाती घेण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने चळवळीत सहभागी होण्याची हाक देण्यात आली आहे.
मंडोळी रोडवर गेल्या गुरुवारी एका सुमारे 100 वर्षे जुन्या विशाल वृक्षाची कत्तल करून तो जमीनदोस्त करण्यात आला. यापूर्वी दोन वेळा सदर वृक्ष तोडण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला जोरदार विरोध दर्शविल्यामुळे संबंधितांना तो वृक्ष तोडण्यात यश आले होते.
ज्यावेळी दुसऱ्यांदा वृक्ष तोडण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्याच्या विरोधात वन खात्याकडे लेखी तक्रार करून विनाकारण झाडे तोडली जाऊ नयेत अशी विनंतीही केली होती. मात्र तरीही संधी साधून गेल्या गुरुवारी शहरातील दुर्मिळ होत चाललेल्या जुन्या मोठ्या वृक्षांपैकी एक असलेला मंडोळी रोडवरील तो वृक्ष तोडून टाकण्यात आला. यामुळे स्थानिक रहिवाशांसह पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात असल्यामुळे आता कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळीप्रमाणे असणारी जुनी मूळ झाडे फक्त 20 टक्के उरली आहेत. मंडोळी रोड येथील वृक्ष तोडत असताना गरज नसताना त्याच्या मागील बाजूस असलेली आणखी दोन झाडेही तोडण्यात आली. कांही जुनी झाडं धोकादायक स्थितीत असल्यामुळे तोडावी लागतात. मात्र मंडोळी रोडवरील त्या झाडांपासून खरं तर कोणाला कांहीच धोका नव्हता. मग कोणी सदर झाडे धोकादायक ठरवून ती तोडण्याचा आदेश दिला? झाडे अतिशय बहुमूल्य असून त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. झाडे आपल्याला ऑक्सिजन देण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रणास मदत करत असल्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या रविवार दि. 26 मार्च रोजी सकाळी 8 वाजता ‘चिपको चळवळ’ हाती घेण्यात येणार आहे.
यावेळी पर्यावरण निसर्गप्रेमींसह अबाल वृद्ध प्रत्येकाने झाडाला मिठी मारून कृतज्ञता व्यक्त करण्याद्वारे श्रद्धांजली अर्पण करायची आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने या चळवळीत सहभागी होण्यासाठी उद्या सकाळी टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेटपासून जवळच असलेल्या लोटस हॉस्पिटल समोर मंडोळी रोडवर उपस्थित रहावे. तसेच अधिक माहितीसाठी 9886504549 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक बेळगाव सोशल नेटवर्कतर्फे करण्यात आले आहे.