बेळगाव लाईव्ह : राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पदवी विद्यार्थ्यांच्या परीक्षा २६ मार्चपासून सुरू होणार आहेत. मात्र, काही विद्यार्थ्यांचे एकाच दिवशी एकाच वेळेत दोन विषयांचे पेपर असल्याने त्यांना प्रवेशपत्र पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामुळे वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांना केली आहे. गेल्या वर्षी देखील अशी समस्या निर्माण झाली होती. एकाच वेळी दोन विषयांचे पेपर एकाच दिवशी होते. यासंबंधी तक्रार केल्यानंतर विद्यापीठाने परीक्षा वेळापत्रकात बदल केले होते. त्यानुसार यावेळीही चुकीचे वेळापत्रक आले असून त्यातही बदल करावे अशी मागणी होत आहे.
पदवी विद्यार्थ्यांची २६ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत परीक्षा आहे. ९ एप्रिलला काही विद्यार्थ्यांचा भूगोल व हिंदीचा पेपर एकाच वेळेत आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना दोन्ही पेपर एकाचवेळी देणे अशक्य आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना प्रवेशपत्र मिळाले असून विद्यापीठाने ही चूक लक्षात घेऊन वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी होत आहे.
दोन दिवस विद्यापीठ बंद असल्याने त्यांच्या निर्दशनापर्यंत ही बाब पोहोचली नाही. मात्र आज विद्यापीठाला ही माहिती दिली जाणार आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या काही मोजक्या महाविद्यालयात भूगोल विषय आहे. तसेच अनेकांनी हिंदी विषय निवडला आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर दोन्ही विषय आले आहेत. हा बदल झाला नाही तर त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने बदल करावा अशी मागणी होत आहे.