शहरातील टिळक चौक येथील अतिशय जुना जीर्ण झालेला एक होर्डिंग सदृश मोठा जाहिरात फलक कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या अवस्थेत असून एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी हा फलक तात्काळ हटवण्याची मागणी केली जात आहे.
टिळक चौकातील अनंतशयन गल्ली कॉर्नरवरील भिंतीवर उंच जागी होर्डिंग सदृश्य एक मोठा जाहिरात फरक बसविण्यात आला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी असलेला हा फलक आता अत्यंत जीर्ण होऊन कोसळण्याच्या अवस्थेत आला आहे.
सदर फलका खालीच रस्त्याशेजारी भाजीविक्रेते भाजी विकण्यास बसतात. तसेच नागरिकांची देखील सततची वर्दळ असते. ही बाब लक्षात घेता हा मोठा जाहिरात फलक आपल्या लोखंडी फ्रेमसह खाली कोसळल्यास अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तेंव्हा एखादा अपघात घडण्याची वाट न पाहता स्थानिक नगरसेवकांसह महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन टिळक चौकातील तो धोकादायक फलक तात्काळ काढून टाकावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.