बेळगाव लाईव्ह : सीमाभागात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक समाजातील नागरिकांवर आपली छाप पाडून निवडणुका ‘कॅच’करण्याचा प्रयत्न राजकारण्यांनी सुरु केला आहे. गेल्या २-२.५ महिन्यात बेळगावमध्ये शूर-वीरांच्या प्रतिमा-पुतळ्यावरून सुरु असलेल्या राजकारणामुळे नेत्यांपेक्षा पुतळ्यांचेच राजकारण सुरु असल्याचे दिसून येत आहे.
धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्ती परिसराचे सुशोभीकरण पार पडल्यानंतर भव्य उदघाटन सोहळा, राजहंसगडावरील शिवमूर्तीच्या अनावरणाचा सोहळा यानंतर इतर भाषिकांचा रोष ओढवून घेतल्याने त्यांना खुश करण्यासाठी संत जगत्ज्योती बसवेश्वर महाराजांपासून वीर राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळी रायन्ना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे राजकारण सुरु झाले.
आता बेळगावच्या सुवर्ण सौध समोर वीर राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळी रायन्ना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण होऊ घातले आहे.
मंगळवारी (दि. २८) सकाळी ११.०० वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते या तिन्ही पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री गोविंद कारजोळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील हेदेखिल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
हिवाळी अधिवेशनादरम्यान या तिन्ही पुतळ्याचं भूमिपूजन सोहळा पार पाडण्यात आला होता. या तिन्ही पुतळ्यासाठी सुमारे अडीज कोटी रुपये खर्च करण्यात आले असून १.८ कोटी राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या पंचधातूच्या पुतळ्यासाठी, ७२ लाख रुपये क्रांतिवीर संगोळी रायन्ना आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी खर्च करण्यात आले आहेत.