बेळगाव लाईव्ह : आमदार अनिल बेनके यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या १.३० कोटी रुपयांच्या विशेष अनुदानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात विद्यार्थ्यांसाठी वाचनालयासह कोचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली.
आज बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके, पालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांच्यासह अनेक दलित नेत्यांच्या उपस्थितीत बेळगाव महानगर पालिका सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सुसज्ज डिजिटल ग्रंथालय, सांस्कृतिक भवन, आयएएस, आयपीएस, केएएस प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
चर्चेनंतर माहिती देताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, बेळगाव शहरातील बिम्स रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सुसज्ज डिजिटल ग्रंथालय, सांस्कृतिक भवन, आयएएस, आयपीएस केएएस प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव असून यासाठी राज्य शासनाकडून १.३० कोटींचा निधी मंजूर झाला असून, या सर्व कामांचा पायाभरणी समारंभ शुक्रवारी होणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी दलित संघटनेचे नेते मल्लेश चौगुले म्हणाले, बेळगावमधील विद्यार्थ्यांनी आजवर विविध क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. आमदार अनिल बेनके यांच्या विशेष प्रयत्नातून १.३० कोटी रुपयांच्या अनुदानातून आयएएस, आयपीएस, केएएस कोचिंग सेंटर आणि डिजिटल लायब्ररीसह सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे, हि आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
यावेळी विविध संस्थांच्यावतीने आमदार अनिल बेनके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालिका अधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.