कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता असल्यामुळे अबकारी खात्याने बेळगावातील धाबे, खानावळी आणि हॉटेल्समध्ये अवैध मद्य विक्री आणि मद्यपानावर बंदी घातली असून सध्या हॉटेल -खानावळीत जाऊन त्यासंबंधी मौखिकरित्या सूचना केली जात आहेत.
विधानसभा निवडणुक आचार संहितेच्या काटेकोर पालनासाठी भरारी पथके कार्यरत होणार असल्याने आतापासूनच अबकारी आणि पोलिस खात्याकडून हॉटेल व खानावळ चालकांना दारू बंदीची मौखिक सूचना करण्यास सुरुवात झाली आहे. बेळगाव शहर, तालुका आणि जिल्ह्यात मांसाहारी हॉटेल्स, खानावळी आणि धाब्यांवर खुलेआम मद्य विक्री आणि मद्य प्राशन केले जाते. याबरोबरच सीएल 9 सारख्या मद्यविक्री दुकानांमध्ये ही परमिट नसताना मद्य प्राशनाला परवानगी दिली जाते. कर्नाटकचा मुख्य महसूल मध्यविक्रीवर अवलंबून असल्याने सरकारकडूनच त्यासाठी अभय देण्यात आले आहे.
लोकसभा आणि विधानसभा आचारसंहितेच्या काळात मात्र अबकारी नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. गोवा आणि महाराष्ट्र येथून होणाऱ्या अवैध दारू विक्रीवर ही नियंत्रण ठेवले जाते. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अविकारी खात्याने आत्तापासून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच खानावळ आणि हॉटेल चालकांना अवैध मद्य विक्री आणि मद्यपान बंद करण्याची सूचना केली आहे.
*बेळगाव जिल्ह्यातील अठरा मतदारसंघात आतापर्यंत 39 लाख 1 हजार 645 मतदारांची नोंद*
बेळगाव – लवकरच विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. त्यामुळे मतदार यादी तयार करणे तसेच नव्याने मतदारांची नोंद करून घेण्याचे काम सुरू आहे. गेल्या दोन महिने 18 दिवसात 68 हजार 608 मतदारांनी नोंद केली आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण 18 मतदारसंघांमध्ये ही नोंद झाली आहे.
23 मार्च 2023 पर्यंत अठरा मतदारसंघांमध्ये 39 लाख 1 हजार 645 मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये 19 लाख 68 हजार 928 पुरुष तर 19 लाख 32 हजार 576 महिला मतदार आहेत. 141 इतर मतदार आहेत.