शहरातील कॅन्टोन्मेंट परिसरात गेल्या सुमारे 14 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झालेला नाही. परिणामी पाण्याविना हवालदिल हैराण झालेल्या कॅन्टोन्मेंट एरियातील रहिवाशांनी आज शुक्रवारी सकाळी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या भागाचा पाणी पुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करावा, अशा मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांनी सादर केलेले निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सध्या उन्हाळ्याला सुरुवात होत असताना कॅन्टोन्मेंट भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजांची पूर्तता होणे कठीण झाले आहे. आमची वसाहती अत्यंत जुनी ब्रिटिश साम्राज्यापासून अस्तित्वात असलेली वसाहत आहे. मात्र एवढी जुनी वसाहत असून देखील 24 तास पाणीपुरवठा पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस वगैरे मूलभूत सुविधा पुरवण्याचा जेंव्हा प्रश्न येतो त्यावेळी या सुविधा बेळगाव शहर परिसरातील अन्य नव्या वसाहतींना त्वरित पुरवल्या जातात. तथापि कॅन्टोन्मेंट भागाच्या बाबतीत दुजाभाव दाखविला जातो.
याखेरीज पाणीपुरवठ्याच्या बाबतीत एल अँड टी कंपनीचे अधिकारी सहकार्याने वागत नाहीत. त्यांच्याकडून कॅन्टोन्मेंटवासियाना उद्धटपणाची वागणूक मिळते. सध्या पाणीटंचाईमुळे सर्वांचे अतिशय हाल होत आहेत. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन आपण आपल्या मध्यस्थीने आमच्या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत करावा ही विनंती, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी साजिद शेख यांच्या समवेत डाॅ. राहिला शेख, रुकसाना नागरगट्टी, शामलाल धनवार, शीला स्वामी आदींसह बहुसंख्य कॅन्टोन्मेंटवासिया उपस्थित होते. कॅन्टोन्मेंटवासियांनी निवेदन सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तात्काळ कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ महापालिका आयुक्त आणि एल अँड टी कंपनीचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यावेळी पाणीच पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असल्याची माहिती अधिकारीवर्गाने दिली. तेंव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट सीईओ आणि एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना तूर्तास युद्धपातळीवर कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिकांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे.
याखेरीज उन्हाळ्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांना सोयीचे पडेल अशा ठिकाणी कुपनलिकांची खुदाई करून पाण्याची व्यवस्था केली जावी, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना दिली.