नितीन गडकरी यांच्यासारख्या भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना हिंडलगा कारागृहातून खंडणीसाठी वारंवार धमकावले जात असल्याच्या प्रकाराची गंभीर दखल कर्नाटक राज्य सरकार आणि कारागृह खात्याने घेतली आहे.
या प्रकारामुळे हिंडलगा कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याने कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचा अहवाल मागविण्यात आल्याचे कळते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हिंडलगा कारागृहातून खंडणीसाठी धमकी देण्यात आलेल्या प्रकरणाची राज्य सरकार व कारागृह खात्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा कैदी जयेश पुजारी यांच्या बराकीमध्ये तपास केल्यानंतर मोबाईल सिम कार्ड सापडले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कारवाईदरम्यान सदर मोबाईल सिम आढळून आल्याने कारागृह खात्याच्या मंत्र्यांकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अलीकडेच आठ दिवसांपूर्वी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी कारागृहात अचानक छापा टाकून घेतलेल्या झाडाझडती वेळी एक मोबाईल व 4 हजार रुपयांची रोकड पोलिसांच्या हाती लागले होती. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी चौघांवर गुन्हाही दाखल केला होता.
हे प्रकरण ताजे असताना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी धमकीचा फोन करण्यात आला आहे. तीन महिन्यात दोन वेळा त्याला धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची अधिक गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना खंडणीसाठी धमकावले जात असल्यामुळे कारागृह विभागाने याची दखल घेऊन हिंडलगा कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचा अहवाल मागविल्याचे कळते.