बेळगाव लाईव्ह : नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसहित गणवेश, बूट आणि पायमोजे उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला असून बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याला गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण खात्याने कर्नाटक वस्त्रोद्योग खाते आणि इतर चार कंपन्यांवर विविध शैक्षणिक जिल्ह्यात हि जबाबदारी दिली आहे. त्यानुसार बेळगाव, विजापूर, बागलकोट व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात वस्त्रोद्योग खाते कापड उपलब्ध करून देणार आहे.
शैक्षणिक वर्षाला सुरुवात होण्यापूर्वी गणवेशाचे कापड उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली असून यंदा विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांबरोबरच वेळेत गणवेश उपलब्ध होणार आहे. शिक्षण खात्याने निविदा प्रक्रिया राबवताना शाळा सुरू होण्यापूर्वी गणेशाचे कापड उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. विलंब झाल्यास दंडाची कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत गणवेशाचे कापड उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे गणवेश उपलब्ध करून दिला नव्हता तर गेल्या वर्षी फक्त एक गणवेश उपलब्ध करून दिला होता. मात्र शाळा सुरू झाल्यानंतर अनेक महिने विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र यावेळी शिक्षण खात्याने पाठ्यपुस्तके आणि गणवेश शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
काही वर्षे विद्यार्थ्यांना दोन जोड गणवेश दिला जात होता. मात्र, सध्या एकच गणवेश देण्याची योजना सरकारने हाती घेतली आहे. गणवेशाबरोबरच विद्यार्थ्यांना दरवर्षी बूट व पायमोजे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्षातही विद्यार्थ्यांना बूट व पायमोजे यांचे वितरण केले जाणार आहे. शिक्षण खात्याने घेतलेल्या या निर्णयाचे पालक व विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गणवेशाबरोबरच पाठ्यपुस्तके देखील लवकर उपलब्ध करून देण्यासाठी काही दिवसांपासून ती प्रत्येक शैक्षणिक जिल्ह्याला पाठवली जात आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात आतापर्यंत ६५ टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला असून मार्चअखेरपर्यंत सर्व पुस्तकांचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे दरवर्षी पाठ्यपुस्तकांसाठी होणारा विलंब यावेळी कमी होऊन विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.