लेफ्टनंट जनरल निवृत्त श्रीकृष्ण सरदेशपांडे यांचे काल बुधवारी बेंगलोर येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कर्नाटकातील पर्यावरण आणि निसर्गप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.
लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर लेफ्टनंट जनरल निवृत्त श्रीकृष्ण सरदेशपांडे यांनी आपले जीवन उत्तर कर्नाटकाच्या पर्यावरण संरक्षणासाठी वाहिले होते. गोव्यातील म्हादाई नदीचे पाणी मलप्रभा नदीपात्रात वळवू नये. तसेच झाल्यास उत्तर कर्नाटकाचे वाळवंट होईल, असा इशारा देऊन त्यांनी कर्नाटक सरकारला अनेक वेळा सावध केले होते.
मलाप्रभा नदी ही एकेकाळी बारमाही नदी होती. मात्र या नदीच्या खोऱ्यामध्ये प्रचंड जंगलतोड करून तुम्ही तिला बारमाही नसलेली नदी बनविले आहे. आता कर्नाटक सरकार म्हादाई नदी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून नदी पात्रावर धरण बांधून नदीचे पाणी वळविण्याचा जो खटाटोप करत आहे, त्यामुळे म्हादाईची देखील दुसरी मलप्रभा होणार आहे’, असे लेफ्टनंट जनरल सरदेशपांडे यांचे सातत्याने म्हणणे असायचे.
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी या गावातील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. शालेय शिक्षणानंतर त्यांनी सैन्याच्या कुमाऊ रेजिमेंटमध्ये सैन्याधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली होती. 1971 चे बांगलादेश युद्ध, 1985 -86 मध्ये श्रीलंकेतील शांतता मोहीम तसेच नागालँडमधील नागा बंडखोरांच्या विरोधातील मोहिमेत त्यांनी भाग घेतला होता.
लेफ्टनंट जनरल श्रीकृष्ण देशपांडे यांना उत्कृष्ट सैन्य सेवेसाठी विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक तसेच युद्ध सेवा पदकाने गौरविण्यात आले होते. सैन्यातून निवृत्त झाल्यावर लेफ्टनंट जनरल सरदेशपांडे पर्यावरण संरक्षणा व्यतिरिक्त अन्य सामाजिक कार्यांमध्येही सक्रिय झाले होते.
पश्चिम घाटातील वर्षावनात जंगलतोड खाणकाम आणि इतर कारणामुळे होत असलेले पर्यावरणाचे नुकसान पाहिल्यावर ते पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत झाले होते.
‘पर्यावरणी’ यासारख्या संस्थेची स्थापना, तसेच वन्य संरक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. कर्नाटक सरकारने या कार्याची दखल घेत त्यांना राज्योत्सव पुरस्काराने देखील गौरवले होते.