Tuesday, January 14, 2025

/

संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नंदगडमध्ये होणार भाजप विजय संकल्प यात्रेचा शुभारंभ

 belgaum

भारतीय जनता पक्षाची विजय संकल्प यात्रा येत्या 2 मार्च रोजी क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचे स्मारक असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील नंदगड (ता. खानापूर) येथून प्रारंभ होणार आहे. या सुमारे 32 कि.मी. अंतराच्या यात्रेचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे.

नंदगड येथील विजय संकल्प यात्रेच्या उद्घाटनानंतर 3 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणखी दोन यात्रांचा शुभारंभ होणार आहे. यापैकी एका यात्रेचे उद्घाटन त्या दिवशी सकाळी बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथून दुसऱ्या यात्रेचे उद्घाटन दुपारी बेंगलोर नजीकच्या देवानहळळीतील अवथ्या येथे होणार आहे. कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने या विजय संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे. राज्याच्या चारी दिशांना काढण्यात येणाऱ्या या यात्रेच्या अग्रभागी विशेष डिझाईन केलेले वाहन अथवा रथ असणारा असून पक्षाचे केंद्रीय नेते यात्रेचे नेतृत्व करणार आहेत.

भाजप प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 1, 2 आणि 3 मार्च रोजी या रथयात्रा राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये मार्गक्रमण करतील. सदर यात्रेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या प्रचार मोहिमेत राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील 50 हून अधिक नेत्यांचा सहभाग अपेक्षित आहे. येत्या एप्रिल अखेरपर्यंत कर्नाटकातील विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता असल्यामुळे तत्पूर्वीच्या कालावधीत राज्यातील सर्व 31 जिल्हे आणि 224 मतदार संघांमध्ये या विजय संकल्प यात्रेद्वारे जनजागृती वजा पक्षाचा प्रचार केला जाणार आहे. सदर 20 दिवसांच्या विजय संकल्प यात्रेची सांगता दावणगिरी जिल्हा केंद्राच्या ठिकाणी होणार आहे. यावेळी काढण्यात येणाऱ्या रॅलीमध्ये इतर मान्यवरांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही सहभाग असणार आहे. राज्याच्या चारी दिशांना मार्गक्रमण करणारे यात्रेचे रथ म्हणजे 8 फूट रुंद आणि 30 फूट उंचीच्या सानुकूलित बसेस असणार आहेत. या बस गाड्यांच्या टपाचा वापर नेतेमंडळींना उभे राहण्यासाठी आणि विजय संकल्प यात्रेदरम्यान जनतेसमोर भाषण करण्यासाठी केला जाणार आहे. याव्यतिरिक्त या बसगाड्या विभिन्न सुविधांनी सुसज्ज असतील. या सुविधांमध्ये मोबाईल चार्जिंग, होम थिएटर, ऑडिओ सिस्टीम, कॅमेरे, एलईडी डिस्प्ले, बॅकअप पॉवरसाठी जनरेटर आदींचा समावेश असणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.