बेळगाव लाईव्ह : राजहंसगडावर प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण राष्ट्रीय पक्षांनी दोनवेळा केले. या घटनेनंतर सीमाभागात संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत असून या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुका आणि शहर समितीची संयुक्त बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली आहे.
मराठा मंदिरात बुधवारी दुपारी तीन वाजता होणाऱ्या बैठकीत राजहंस गडावरील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या शुध्दीकरण सोहळ्याच्या आयोजना संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पक्षांनी राजकारण करत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दोन वेळा अनावरण केले आहे.
आगामी निवडणूक डोळ्या समोर ठेऊन मराठी मतांचे राजकारण करण्यासाठी राष्ट्रीय पक्षांनी केलेला शिवरायांचा अवमान याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मूर्तीचे शुध्दीकरण केले जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्याचे आराध्य दैवत आहेत. आमच्या दैवताचा वापर राजकारणासाठी केला गेला, याबाबत संताप व्यक्त होत आहे. यासाठी मराठा समाज, शिवभक्त आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शिवरायांच्या मूर्तीचे शुध्दीकरण केले जाणार आहे.
या बैठकीला कार्यकर्त्यांनी आणि तमाम शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहर समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि तालुका समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.