बेळगाव लाईव्ह : २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशात कमळ फुलले. २०१४ नंतर देशभरात भारतीय जनता पक्ष बहुमतात आला. अनेक ठिकाणी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले.
देशवासियांना भाजप आणि मोदींच्या नेतृत्वाची भुरळ पडली आणि यादरम्यान अनेक ठिकाणी काँग्रेसची पीछेहाट झाली. यामध्ये कर्नाटक राज्याचाही समावेश आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळल्यानंतर भाजपचेच निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले असून केंद्रीय नेतृत्वाने याची दखल घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून रणनीती आखली आहे.
देशभरात भारत जोडो पदयात्रा झाली विविध ठिकाणी होणाऱ्या या पदयात्रेत अनेक स्थानिक नेत्यांनी सहभाग नोंदविला कर्नाटकात बेळ्ळारी मार्गे पदयात्रा उत्तर भारतात निघून गेली. संपूर्ण देशभर संचार करणारी ही यात्रा बेळगावमध्ये पोहोचलीच त्या निमित्ताने राहुल गांधी बेळगावात आले नाहीत मात्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बेळगावमध्ये आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील ५-६ महिन्यात निवडणुकीचे वारे वाहायला सुरु झाल्यानंतर बेळगावमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली यांच्यासह थेट पंतप्रधानांनी बेळगावात रोड शो केला. यादरम्यान माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्याव्यतिरिक्त काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीतील नेत्यांऐवजी केंद्रीय नेत्यांनी कधीच हजेरी लावली नाही. मागील निवडणुकीत पिछाडीवर असलेल्या काँग्रेसने आगामी निवडणूक गांभीर्याने घेतली असून या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढविण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
२० मार्च रोजी बेळगावमधील सीपीएड मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेत राहुल गांधी संबोधन करणार आहेत. या सभेची स्थानिक नेत्यांसह राज्यातील अनेक नेत्यांनी जोरदार तयारीही केलेली दिसून येत आहे. या माध्यमातून उत्तर कर्नाटकातील काँग्रेसचे बिगुल वाजणार आहे.
यापूर्वी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भाजपने शक्तिप्रदर्शन केले आहे. विधानसभेत बेळगावचे भाजपमधील १२ आमदार आहेत. मात्र काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढविण्यासाठी राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले असून केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनीही बेळगावमध्ये काँग्रेसच्या जागा वाढविण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे.
कर्नाटकातील काँग्रेसच्या पिछाडीवर लक्ष केंद्रित करत आता केंद्रीय काँग्रेस नेत्यांनीही बेळगावकडे आगेकूच केली आहे. या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस रणशिंग फुंकणार असे चित्र दिसत आहे. त्यामुळे बेळगावमध्ये आयोजिलेली राहुल गांधी यांची सभा आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काँग्रेसला नवी उभारी देईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.