बेळगाव लाईव्ह : महागाईचा आलेख ‘वाढता वाढता वाढे’ अशा पद्धतीने वाढत असून दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह, औषधांच्या किंमती आणि आता त्यापाठोपाठ १ एप्रिलपासून वीज दरवाढ होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. कर्नाटक राज्यातील सर्वच वीज वितरण कंपन्यांकडून वीजदरवाढ घोषित केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून वाढत्या महागाईत पुन्हा ग्राहकांना वीजदरवाढीची झळ बसणार आहे.
दरवर्षी विद्युत नियामक मंडळाकडून (केईआरसी) १ एप्रिलपासून राज्यात विजेचे नवे दर लागू केले जातात. यावर्षीही दरवाढीसाठी जानेवारी महिन्यापासूनच केईआरसीकडून निर्देश देण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात धारवाड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हुबळी विभागीय तक्रार निवारण बैठक झाली होती.
या बैठकीत वाढीव वीजबिलाबाबत उद्योजक, व्यापाऱ्यांनी आपल्या तक्रारी मांडल्या होत्या. 1 एप्रिलपासून दरवाढ होण्याचे निश्चित असले तरी विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे ही दरवाढ काही दिवस पुढे ढकलण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात कोणत्या ना कोणत्या मार्गाने दरवाढ करण्यात आली असून त्यात आता पुन्हा दरवाढीची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
वाढीव दराचा परिणाम निवडणुकीवर होऊ नये, या हेतूने राज्य सरकारने दरवाढ थांबविली आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 2018 सालीही याच दरम्यान आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे एक महिन्यानंतर विजेचे नवे दर लागू करण्यात आले होते.
याच पद्धतीने यावेळीही निवडणुका झाल्यानंतर की निवडणुकांपूर्वी दरवाढ केली जाणार याबाबत चर्चा सुरू आहे. जर दरवाढ झाली तर सर्वसामान्य ग्राहकांसह उद्योजक, व्यापारी, लघुउद्योजक या सर्वांनाच फटका बसणार आहे.