केवळ मतांच्या राजकारणासाठी राष्ट्रीय पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करत आहेत त्यांचा अपमान करत आहेत. आमच्या दैवताचा होत असलेला हा अपमान आपण शांतपणे पाहत राहिलो तर पापाचे धनी होऊन बसू. त्यामुळे मराठी माणसांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवून देऊया असे आवाहन माजी नगरसेवक अमर येळळूरकर यांनी केले.
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 19 मार्च रोजी राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाची जनजागृती गांधीनगर येथे करण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वकील येळळूरकर म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही कर्नाटक अस्तित्वात नव्हते. स्वराज्याचे संकल्प शहाजीराजे यांनी संपूर्ण कर्नाटकात राज्य निर्माण केले होते. पण आज कर्नाटकातील काही लोकांकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर थोर लोकांचा अपमान केला जात आहे. राजहंसगड येथे सामान्य लोकांच्या पैशातून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे पण केवळ मराठी मतांवर डोळा ठेवून राष्ट्रीय पक्षांकडून दोन दोन वेळा अनावरण करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर राजकारणासाठी करून अपमान करण्यात आला आहे.
सीमा भाग आणि कर्नाटकातील इतर भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा राजरोसपणे अपमान करण्यात येतो. बंगळूर येथे झालेल्या अपमाना विरोधात आंदोलन करणाऱ्या मराठी भाषिकांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात येतात. त्यावेळी हेच राजकीय पक्ष कोणताही शब्द काढत नाहीत. आता मराठी मतांसाठी राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात येत आहे. आपल्या दैवताचा अपमान होत असताना शांतपणे पाहत बसणे हे मोठे पाप असेल. आपण या पापाचे धनी होणार आहात का सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे समितीने आयोजित केलेल्या दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून द्या, असे आवाहन केले.
यावेळी समिती नेते रणजित चव्हाण पाटील रमाकांत कोंडुसकर आणि जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी,सूरज कणबरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुद्धीकरण कार्यक्रमाला मराठी माणसांची एकजूट दाखवून द्यावी असे आवाहन केले.
या बैठकीला गांधीनगर येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मारूती चव्हाण, अण्णापा हिरोजी
सचिन चव्हाण,दिपक कणबरकर मनिष कटारे दत्तात्रय रमाकांत कोंडूसकर,सुनील धूडूम मोहन राजगोळकर,सूमीत वंटमूरकर छोट्या लंगरकांडे
प्रमोद वंटमूरकर कोमल पाटील,मनोज तशिलदार दिपक तशिलदार,शुभम तशिलदार देमाणाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.