Wednesday, December 25, 2024

/

विद्यमान आमदार-खासदार निवडणुकीला मुकणार?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीसाठी आजी – माजी लोकप्रतिनिधींसह राजकारणात नवख्या असलेल्या इच्छुक उमेदवारांची भलीमोठी यादी जरी नजरेसमोर असली तरी अद्याप अधिकृत उमेदवारीबाबत राष्ट्रीय पक्षांनी कोणत्याच हालचाली सुरु केलेल्या दिसून येत नाहीत. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार – खासदारांना संधी देण्याबाबत नकारात्मक भूमिका घेत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

लोकसभा आणि विधान परिषदेत काही विधेयके मंजूर होत नाहीत. त्यामुळे एक एक जागा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे हायकमांडचे मत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सहभागी होण्यासाठी वर्षभरापासून पडद्याआडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कसरत करणाऱ्या इच्छुकांची निराशा होण्याची शक्यता आहे.

कारण २२४ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही लोकसभा, राज्यसभा व परिषदेच्या सदस्यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.

सत्ताधारी भाजपमधून आगामी विधानसभा निवडणुकीत डझनहून अधिक खासदार आणि विधान परिषदेचे सदस्यांनी विधानसभा निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली असली तरी भाजप हायकमांडने मात्र त्याला होकार दर्शवलेला नाही. लोकसभा, राज्यसभा आणि विधान परिषदेचे सदस्य राजीनामा देऊन किंवा त्याशिवाय विधानसभा निवडणूक लढले आणि ते जिंकले तर ते आपल्या पदाचा राजीनामा देतील. मात्र यावेळी काही जणांनी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे निवडणुकीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी भाजप हायकमांडने कोणालाही परवानगी दिलेली नाही.

खासदार शिवकुमार उदासी, जी. एम. सिद्धेश्वर, पी. सी. मोहन, प्रताप सिंग, करडी संगण्णा, पी. सी. गद्दीगौडर, रमेश जिगजिनगी, डी. व्ही. सदानंद गौडा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, शोभा करंदलाजे, ए. नारायणस्वामी, प्रदेश भाजप अध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी राष्ट्रीय राजकारणातून राज्याच्या राजकारणात येण्याचा मानस पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केला आहे. तर प्रल्हाद जोशी, सदानंद गौडा, शिवकुमार उदासी, शोभा करंदलाजे, अनंतकुमार हेगडे यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करत राजकारणात येण्यास उत्सुकता दर्शविली आहे.

भाजपमधील मोठ्या संख्येने खासदार विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असले तरी पक्ष हायकमांड त्याला परवानगी देण्यास तयार नाही. हायकमांडने सहमती दर्शवल्यास भाजपचे दहाहून अधिक खासदार विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. या खासदारांनी मागील विधानसभा निवडणूकही लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. भाजप हायकमांडच्या या निर्णयामुळे पक्षांतर्गत नव्या हालचालींना वेग येण्याची चिन्हे असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.