बेळगाव लाईव्ह : राजकीय स्वार्थासाठी राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे राष्ट्रीय पक्षांनी दोन वेळा अनावरण केले. यामुळे शिवाजी महाराजांचा आणि समस्त शिवभक्तांच्या भावनेचा अवमान झाल्याचा आरोप सीमाभागात व्यक्त होत आहे. राष्ट्रीय पक्षांनी केलेल्या या कारनाम्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे शुद्धीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज मराठा मंदिर येथे आयोजिण्यात आलेल्या बैठकीत रविवार दिनांक 19 मार्च रोजी राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे शुद्धीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर यांनी ग्रामीण आमदारांच्या दिखाऊ शिवप्रेमावर ताशेरे ओढत ज्यांना स्वतःच्या निवासस्थानाच्या परिसरातील शिवमूर्तीसंदर्भात निर्णय घेता आला नाही, त्या राजहंसगडावरील शिवमूर्तीसंदर्भात काय बोलणार? असा सवाल उपस्थित केला. राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनी केलेला दिखावा आणि यामुळे झालेला शिवरायांचा अवमान यासाठी शुद्धीकरण सोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने मराठी जनतेने सहभागी होऊन मराठी माणसाची ताकद आणि एकजूट राष्ट्रीय पक्षांना दाखवावी, असे आवाहन केले. तसेच भगव्या झेंड्यासहित राजहंसगडावर उपस्थित राहून महाराष्ट्रातील नेत्यांना आपली ताकद दाखवावी, असे आवाहन मनोहर किणेकर यांनी केले.
राजहंसगडावर प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे कामकाज हे जनतेच्याच पैशातून झाले असून दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडून स्वतःच हे काम केल्याचा कांगावा करण्यात येत आहे. शिवाय या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नेत्यांनी दर्शविलेली उपस्थिती ही निषेधार्थ असून काळात शिष्टाचार म्हणून याठिकाणी भविष्यात जे नेते येतात त्यांना याच भगव्या झेंड्यांच्या ऐवजी काळे झेंडे दाखविण्याची तयारी आणि त्यांना रोखण्याचा अधिकार सीमा भागातील मराठी जनतेला आहे, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील बोलताना म्हणाले, महाराष्ट्रातील नेत्यांना ज्या पद्धतीने प्रत्युत्तर देणे गरजेचे होते, त्या पद्धतीने समितीने त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यातून महाराष्ट्रातील नेत्यांना धडा देखील मिळालेला आहे. शिवाजी महाराजांच्या नावावरून राजकारण्यांनी कितीही तांडव केले, कितीही प्रयत्न केले, तरी मराठी माणसाचे मत बदलणार नाही. मराठी जनतेची ताकद दाखवण्यासाठी येत्या 19 तारखेला राजहंस गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला लोक सोहळ्याचे स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी प्रत्येक गावातून एक बैलगाडी आणि पाच लिटर दूध याच प्रमाणे शहरातील प्रत्येक गल्लीतून शंभर लोक या सोहळ्यात सहभागी होतील या दृष्टिकोनातून जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अवमान पाहता समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पाद्यपूजन, पाच नद्यांचे पाणी आणून मूर्तीचे शुद्धीकरण आणि दुग्धाभिषेक अशा पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा ठरवावी आणि एकजुटीने हा लोक सोहळा यशस्वी करावा. याच प्रमाणे महाराष्ट्रातील नेत्यांना देखील एक संदेश पोहोचवावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
या बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, एड. राजाभाऊ पाटील, बी वाय येतोजी, एम जी पाटील आदींसह समिती नेते, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.