बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय पक्षांनी वैयक्तिक आणि राजकीय स्वार्थासाठी राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या राजकारणाला आणि छत्रपती शिवरायांच्या झालेल्या अवमानाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांची ताकद दाखविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने राजहंसगडावर १९ मार्च रोजी भव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण करण्यासाठी आयोजिलेल्या या सोहळ्यात शिवबाचे वंशज, अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याचे बाळकडू रक्तात असणाऱ्या, समाजातील बारा बलुतेदारांना,अठरापगड जातींना सर्वांना सोबत घेऊन सुखान समाधानान जगणे अशी ओळख असणाऱ्या प्रत्येकाने या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहणे गरजेचे आहे.
सीमाभागाचा मानबिंदू असणाऱ्या राजहंसगडासंदर्भात अनेक गोष्टी आजवर घडल्या. मात्र मराठी अस्मितेचा मानबिंदू असणारा हा गड आजही तितक्याच दिमाखात उभा आहे. अनेक वर्षापासून शिवभक्त या गडावर नित्यनेमाने येतात. विविध उपक्रम राबविले जातात. अलीकडेच या गडाचा विकास झाला. विकासकाम हे स्तुत्य आहे.
परंतु विकासकामावरून झालेल्या राजकारणामुळे अनेकांची मने दुखावली गेली आहेत. शिवाजी महाराज आणि मराठी भाषिक हा राजकारणाचा विषय मुळीच नाही. मात्र दुर्दैवाने सीमाभागात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मराठी भाषिकांच्या भावनेचा खेळ झाला. या परिस्थितीवर मात करून पुन्हा एकदा आपली अस्मिता सिद्ध करण्याची वेळ आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचेच राजे आहेत. ते कुठल्या एका विशिष्ट समाजापुरते आणि भाषेपुरते मर्यादित नाहीत, ही बाब दुर्दैवाने आजवर कुणाच्या लक्षात आली नाही. जिथे राजकारण दिसते आणि जिथे वैयक्तिक स्वार्थ दिसतो त्याठिकाणी राजकारणी आघाडीवर असतात. मात्र बेळगावमध्ये सातत्याने होणाऱ्या शिवरायांच्या अवमानावेळी हेच नेते ब्र काढत नाहीत. राजहंसगडावर झालेला प्रकार हा निंदनीयच आहे. यापुढे सीमाभागात किंवा इतर कुठेही हा प्रकार होऊ नये अशी इच्छा शिवभक्त बाळगत आहेत.
राजहंसगडावर होणाऱ्या कार्यक्रमात आपली निष्ठा आणि शिवभक्ती दाखवून देण्याची संधी शिवभक्तांसमोर चालून आली आहे. निवडणुकीपुरता मराठी माणसाचा वापर करून इतर वेळी किड्या मुंग्यांची किंमत देणाऱ्या राजकारण्यांना चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी राजहंसगडावर होणाऱ्या सोहळ्यात प्रत्येक मराठी भाषिकाने आणि शिवप्रेमीने आपल्या कुटुंबासहित आपली ताकद दाखविण्याची गरज आहे.
आपण लाचार नाही तर स्वाभिमानी आहोत हे दाखविण्यासाठी उद्या होणाऱ्या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात येत आहे.