बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीचा कालावधी जवळ येत चालला असून या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि वरिष्ठ नेत्यांना आपली ताकद दाखविण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांकडून सभा-समारंभाचे आयोजन करण्यात येत असून, सभांना गर्दी व्हावी म्हणून रोजगार हमी योजनेमध्ये कार्यरत असणाऱ्या महिला कामगारांना वेठीस धरण्यात येत असल्याची बाब पुढे आली आहे.
बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील एका ग्रामपंचायतीमध्ये पीडीओ, सेक्रेटरी यांनी रोहयो कामगारांना “तुम्ही सभेला या, नाहीतर गाठ आमच्याशी आहे, तुमचे काम आमच्याच हातात आहे” अशापद्धतीने धमकावले असून काम मिळावे म्हणून अनेकजण सभेला गेल्याची बाबदेखील समोर आली आहे. पीडीओ, सेक्रेटरीच्या माध्यमातून कामगारांवर दबाव आणला जात आहे. अशी मागणी करण्यात आली आहे. पीडीओ, सेक्रेटरींवर कारवाई करावी या मागणीसाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून जिल्हा पंचायत मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब अकुशल कामगारांना काम देण्यासाठी रोजगार हमी योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गावोगावी राबविण्यात येत आहे. यामुळे गरजूंना दिलासा मिळाला आहे. कामासाठी होणारे ग्रामीण भागातील कामगारांचे स्थलांतर थांबले आहे.
परंतु, कामगारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे.
बेळगाव आणि परिसरात होणाऱ्या राजकीय सभांना गर्दी व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधी पीडीओ, सेक्रेटरी यांच्यावर दबाव आणून सभेला कामगारांच्या उपस्थितितसाठी धमकावण्यात येत आहे. परिणामी, भयभीत झालेले कामगार सभांना उपस्थित राहत आहेत. यामुळे कामगारांच्यामध्ये संताप निर्माण झाला आहे.
राजकीय सभांना उपस्थित राहण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्यांवर कारवाई करावी. पीडीओ, सेक्रेटरी यांची चौकशी करावी आणि यापुढे याप्रकारच्या घटना थांबवाव्यात, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून करण्यात आली. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे मिथिल जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.