अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. 5 मार्च 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी, मराठा मंदिर, रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ बेळगाव या ठिकाणी 4 थ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर संमेलनाचे अध्यक्षपद पुण्याच्या ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे या भूषविणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ.भा.म.सा. परिषदेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण हे असणार असून उद्घाटक म्हणून प्रसिद्ध उद्योजक अप्पासाहेब गुरव उपस्थित राहणार आहेत.
तसेच सन्माननीय अतिथी म्हणून अ.भा.म.सा. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे व राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील हजर असणार आहेत. 4 थे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन ग्रंथदिंडी व उद्घाटन सत्रा व्यतिरिक्त एकूण चार सत्रात होणार आहे.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत अध्यक्षीय भाषण होणार असून त्यानंतर कोल्हापूरचे जेष्ठ कथाकार अप्पासाहेब खोत यांचा कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे. स्नेहभोजनानंतर दुपारी 3 वाजता कवी संमेलन होईल. या कवी संमेलनात कवी अनिल दीक्षित (पुणे), कवी रमजान मुल्ला (सांगली), कवी मधु पाटील (बेळगाव), कवयित्री शीतल पाटील (बेळगाव) आणि कवयित्री अस्मिता आळतेकर (बेळगाव) हे सहभागी होणार आहेत.
संमेलनाच्या शेवटच्या चौथ्या सत्रात दुपारी 4 वाजता राधानगरी कोल्हापूरचे हास्य सम्राट संभाजी यादव यांचा ‘हास्य दरबार : हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा’ हा विनोदी कार्यक्रम होणार आहे.
तरी बेळगावसह सीमाभागातील समस्त मराठी भाषिक तसेच साहित्य प्रेमींनी या संमेलनास मोठ्या संख्येने हजेरी लावून शोभा वाढवावी, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.