हिंदुत्वासाठी कार्य करत असताना आमच्यावर जाणीवपूर्वक दाखल करण्यात आलेले खटले म्हणजे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणावणाऱ्या ढोंगी राज्यकर्त्यांचे कटकारस्थान असून या ढोंगी नेत्यांना भविष्यात जनता निश्चितपणे धडा शिकवेल, असे परखड मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी व्यक्त केले.
कर्नाटक विधानसभा निवडणुक जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने बेळगाव न्यायालयाबाहेर कोंडुसकर यांची भेट घेतली असता ते बोलत होते. आता निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे आम्ही निवडणुकीचे जे कांही कार्य आहे ते कायद्याच्या चौकटीत करणार आहोत असे सांगून हिंदुत्वाचे कार्य करत असताना गेल्या 20 वर्षात माझ्यासह माझ्या कार्यकर्त्यांवर किमान 50 गुन्हे सरकारी अधिकारी आणि राजकारणी लोकांनी जाणून बुजून नोंदविले आहेत.
परिणामी कामधंदे सोडून आठवड्यातील कमीत कमी तीन दिवस आम्हाला न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात, अशी माहिती कोंडुसकर यांनी दिली.
हिंदुत्वाचे कार्य करत असताना सरकार आणि राजकीय नेत्यांकडून जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देऊन आमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यासह माझ्या कार्यकर्त्यांवर जमिनीचा व्यवहार, पैशाची लुबाडणूक, काळे धंदे वगैरे सारखा कोणताच वैयक्तिक बदनामकारक खटला दाखल नाही, जे कांही खटले आहेत ते सर्व समाजकार्य, धर्मकार्य करत असल्याबद्दलचे आहेत.
हे सर्व कांही धर्माच्या नावावर निवडून आलेल्या स्वतःला हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्या ढोंगी राज्यकर्त्यांचे कटकारस्थान आहे असे सांगून या ढोंगी नेत्यांना भविष्यात जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे कोंडुसकर यांनी स्पष्ट केले.