बेळगावचे धडाडीचे मराठी नेते आणि कर्नाटक राज्य भाजप ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस किरण जाधव यांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी शुभाशीर्वादाच्या स्वरूपात पाठिंबा देऊन सुयश चिंतले आहे.
राज्यातील मराठी समुदायाच्या उत्कर्षासाठी झटणारे बेळगाव शहरासह जिल्ह्यातील मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांनी नुकतीच माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांची सदिच्छा भेट घेतली. ज्येष्ठ भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री असलेल्या येडीयुरप्पा हे गेल्या कांही दशकांपासून भाजपचे अविभाज्य अंग असून कर्नाटकात भारतीय जनता पक्ष उदयास आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कर्नाटकातील सर्व समुदायांमध्ये प्रिय असणाऱ्या या नेत्यासाठी शेतकरी हा पहिले प्राधान्य आहे. बी. एस. यडीयुरप्पा हे नेहमीच शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. आगामी विधान सभा निवडणुकीत बेळगाव दक्षिण मधून किरण जाधव इच्छुक आहेत त्या पार्श्वभमीवर त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून येडी यांनी जाधव यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आपल्या सदिच्छा भेटीप्रसंगी किरण जाधव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 90 हजार मराठी मतदारांसह मराठी भाषिकांचे वर्चस्व असलेल्या बेळगाव दक्षिण मतदार संघातून आपण भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे माजी मुख्यमंत्री यडीयुरप्पा यांना सांगितले. तसेच येथील मराठी समुदायाला भेडसावणाऱ्या समस्या, त्यांचा विकास आणि प्रगतीसाठीचा स्वतःचा दृष्टिकोन, योजना याची थोडक्यात माहितीही जाधव यांनी दिली. सदर माहिती आत्मीयतेने ऐकून घेतल्यानंतर बी. एस. यडीयुरप्पा यांनी किरण जाधव यांना आपल्या आशीर्वादाच्या स्वरूपात पाठिंबा दर्शवून सुयश चिंतले.
येडीयुराप्पा यांच्या भेटीनंतर बोलताना किरण जाधव म्हणाले की, कर्नाटकातील सर्व समुदायांचे कल्याण चिंतनाऱ्या बी. एस. यडीयुरप्पा यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला भेटण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. कर्नाटक मराठा विकास महामंडळ (केएमडीसी) स्थापन करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न आणि त्यांची मराठी नेत्यांशी असलेली संलग्नता हेच दर्शवते की, राज्यातील सर्व समुदायांच्या सामाजिक -आर्थिक विकासासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे.
आगामी विधानसभा निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे आणि मला विश्वास आहे की यडीयुरप्पा यांचा पाठिंबा व मार्गदर्शनाच्या जोरावर आपण सर्वजण संघटितपणे मराठा समुदायाची आणि पर्यायाने राज्याची उन्नती साधणार आहोत.