बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकेल. मात्र तत्पूर्वी लोकप्रतिनिधी, राजकारणी, नेतेमंडळी, इच्छुक उमेदवार, राष्ट्रीय पक्ष आणि प्रशासनानेही युद्धपातळीवर तयारी सुरु केली आहे.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी ज्या जोमाने लोकप्रतिनिधी आणि इच्छुकांची धावपळ सुरु आहे त्याच जोमाने निवडणूक प्रक्रियेत कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी निवडणूक आयोग, प्रशासन देखील कंबर कसून पहारा देतंय. अजून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जरी जाहीर झाली नसली तरी चेकपोस्टवर आतापासूनच कडक पहारा देण्यात येत असल्याचे निदर्शनात येत आहे.
निवडणूक आयोगाने यासंदर्भात कडेकोट बंदोबस्ताची तयारी पूर्ण केली असून बुधवारपासून चेकपोस्टवर प्रांताधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. चिक्कोडी विभागातील बहुतांश तालुके सीमेवर असल्याने या भागात अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना यापूर्वीच जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी दिल्या आहेत. त्यानुसार चिक्कोडी विधानसभा मतदारसंघात तीन चेकपोस्ट सुरू केले असून प्रांताधिकारी माधव गिते यांनी बुधवारी चेकपोस्टवर येऊन पाहणी केली आहे.
चिक्कोडी विभागात २२ चेकपोस्ट तयार करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. यावर्षी प्रथमच निवडणूक जाहीर होण्याआधीच चेकपोस्ट सुरू केले आहेत. त्यामुळे सर्व नाक्यांवर कडक उपाययोजना केल्या आहेत. प्रत्येक चेकपोस्टवर पोलिस, महसूल खात्याचे एक अधिकारी नियुक्त केले असून या नाक्यांवर चोवीस तास बंदोबस्त राहणार आहे.
प्रांताधिकाऱ्यांनी मंगळवारी व बुधवारी विविध चेकपोस्टवर पाहणी केली. त्यावेळी केवळ जुजबी चौकशी न करता वाहनांतील साहित्याचीही तपासणी करण्यास सुरूवात केली. कोगनोळी टोल नाक्यावरील चेकपोस्टची पाहणी दरम्यान प्रांताधिकारी गीते यांनी स्वतः वाहनांची कडक तपासणी केली.