देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या ‘कर्नाटक विधानसभा निवडणूक -2023’ ची घोषणा आज बुधवारी भारतीय निवडणूक आयोगातर्फे करण्यात आली असून आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. एका टप्प्यामध्ये येत्या 10 मे 2023 रोजी कर्नाटक विधानसभा निवडणूक होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार असल्याचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी घोषित केले आहे.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनाच्या प्लॅनरी हॉलमध्ये आज सकाळी 11:30 वाजता आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार बोलत होते. ही निवडणूक हिंसाचार मुक्त, पुनर्मदान मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शी होईल असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आजची पत्रकार परिषद समाप्त होताच लागलीच जारी होईल. सदर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी 13 ते 20 एप्रिल 2023 हा असणार आहे. त्यानंतर 21 ते 23 एप्रिल उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 24 एप्रिल ही असणार आहे. त्यानंतर येत्या बुधवार दि. 10 मे 2023 रोजी निवडणुकीचे मतदान होणार असून शनिवार दि 13 मे 2023 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील. एकंदर येत्या 24 मे पूर्वी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसह देशातील निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या जागांपैकी 26 जागा दलित, 25 आदिवासी आणि 173 सामान्य उमेदवारांसाठी राखीव आहेत. सध्याला यापैकी 117 जागांवर भाजपचे वर्चस्व आहे तर उर्वरित जागांपैकी 69 जागा काँग्रेस, 32 निधर्मी जनता दल आणि 6 जागा अपक्षांच्या ताब्यात आहेत. राज्यातील मतदारांची संख्या एकूण 5.22 कोटी इतकी असून यामध्ये 2.62 लाख पुरुष आणि 2.52 लाख महिलांचा समावेश आहे. यावेळी 9.17 लाख नव्या मतदारांची मतदार यादीत भर पडली असून नव्या मतदारांमध्ये प्रामुख्याने युवा पिढीसह किन्नर, कामगार, ज्येष्ठ नागरिक आदींचा समावेश आहे.
पत्रकार परिषदेत युवक -युवती, किन्नर वगैरे मतदारांच्या संख्येत झालेल्या वाढीची आकडेवारी देताना येत्या 1 एप्रिल 2023 रोजी ज्या युवक -युवतींची वयाची 18 वर्षे पूर्ण झाली असतील त्यांना देखील मतदानाचा हक्क बजावता येईल असे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 58 हजाराहून अधिक निवडणूक मतदान केंद्रे स्थापण्यात येणार असून विशेष म्हणजे यापैकी 240 मॉडेल पोलिंग स्टेशन्स अर्थात आदर्श मतदान केंद्रे असणार आहेत.
त्याचप्रमाणे एकूण मतदान केंद्रांपैकी 224 मतदान केंद्रे युवा सरकारी कर्मचाऱ्यांकडून तर 100 केंद्रे दिव्यांगांकडून हाताळली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या 2013 मागोमाग 2018 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकात 72.4 टक्के इतके कमी मतदान नोंदविले गेले होते. प्रामुख्याने राज्यातील बेंगलोर मध्य, उत्तर, दक्षिण या ठिकाणी निराशाजनक मतदान झाले होते. याची गांभीर्याने दखल घेत यावेळी मतदानाच्या प्रमाणात वाढ होण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाकडून जनजागृती मोहीम राबविली जात आहे. यासाठी आयोगाला कर्नाटकातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे सहकार्य लाभत आहे. मतदान वाढीसाठी मॅरेथॉन प्रमाणे ‘इलेक्थाॅन’ शीर्षकाखाली ही जनजागृती मोहीम सुरू आहे. निवडणुकीत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी आवश्यक सर्व ती खबरदारी घेण्यात आली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारची आमिष दाखवणे, दारू अथवा अमली पदार्थांचा सुळसुळाट, पैशाच्या ताकदीचा वापर आदी गैरप्रकारांच्या विरोधात निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत या गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही. यासाठी राज्यातील पोलीस व अबकारी खात्यासह संबंधित अन्य खात्यांचे उत्तम सहकार्य लाभत असून हे गैरप्रकार रोखण्यासाठी त्यांच्याकडून कडक कारवाई केली जात आहे, अशी माहितीही भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
पत्रकार परिषदेस कार्यकारी निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे, निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्यासह भारतीय निवडणूक आयोगाचे अन्य वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान भ्रष्टाचार, सांप्रदायिक तणाव, महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वाद आणि आरक्षण वाद हे होऊ घातलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मुख्य मुद्दे असणार असून ही निवडणूक म्हणजे बोम्मई सरकारसाठी एक परीक्षाच असणार आहे.
कर्नाटक राज्यात एका टप्प्यात होणार मतदान
10 मे रोजी मतदान
13मे रोजी मतमोजणी#ECI pic.twitter.com/PPUmbAF9lK— Belgaumlive (@belgaumlive) March 29, 2023