खानापूर तालुक्यातील मोदेकोप क्रॉस जवळ आठ दिवसांपूर्वी जप्त करण्यात आलेल्या गोवा बनावटीच्या 750 बॉक्स पैकी तब्बल 301 बॉक्स चक्क अबकारी अधिकाऱ्यांनीच हडप केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खानापूरच्या दोन अबकारी निरीक्षकांसह एकूण 5 जणांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
निलंबित करण्यात आलेल्या अबकारी निरीक्षकांची नावे सदाशिव कोरती आणि दावलसाब शिंदोगी अशी आहेत. त्यांच्यासह अन्य दोघे अबकारी उपनिरीक्षक आणि एका कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई झाली आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, जांबोटी -खानापूर महामार्गावर मोदेकोप क्रॉस जवळ गेल्या 7 मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास खानापूरचे अबकारी निरीक्षक दावलसाब शिंदोगी आणि सदाशिव कोरती यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून एक 12 चाकी कंटेनर अडवून त्यात मोठ्या प्रमाणात असलेली गोवा बनावटीची दारू जप्त केली.
त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी संगनमताने जप्त करण्यात आलेल्या दारूच्या एकूण 750 बॉक्स पैकी केवळ 452 बॉक्स जप्त केल्याचे दाखवून गुन्हा दाखल करून घेतला. तसेच उर्वरित 301 बॉक्स दारू कार्यालयासह आपापल्या घरामध्ये दडवून ठेवली होती.
याबाबतची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अबकारी अधीक्षक विजयकुमार हिरेमठ यांच्या नेतृत्वाखालील चौकशी पथकाने उपरोक्त अधिकाऱ्यांची उलट तपासणी घेतली.
त्यावेळी कंटेनर घेऊन येणाऱ्या वाहनाची माहिती देणाऱ्या खबऱ्याने त्या मोबदल्यात 300 बॉक्सची मागणी केली होती. त्यासाठी जप्त करण्यात आलेल्या 750 बॉक्स पैकी 301 बॉक्स बाजूला काढून बॉक्स बाजू ठेवले होते, असा कबुली जबाब निलंबित अधिकाऱ्यांनी दिला. याबाबतचा अहवाल अबकारी उपायुक्त एम. वनजाक्षी यांच्याकडे सादर करण्यात आल्यानंतर त्यांनी पाचही अधिकाऱ्यांना दोषी ठरवत निलंबनाची कारवाई केली आहे.