बेळगाव लाईव्ह : येत्या ३१ मार्च पासून होणाऱ्या दहावी परीक्षेसंदर्भात शिक्षण विभागाने महत्वपूर्ण घोषणा करून दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. दहावी परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली असून यंदाच्या परीक्षेतदेखील १० टक्के ग्रेस मार्क देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे, अशी माहिती दहावी परीक्षा मंडळाचे संचालक रामचंद्र यांनी दिली.
‘कोरोना बॅच’म्हणून यंदा देखील १० टक्के ग्रेस मार्क देण्याचा निर्णय घेण्यात आला असून केवळ तीन विषयात हे ग्रेस मार्क देण्यात येणार आहेत. भाषा आणि इतर मुख्य विषयांसाठी सदर ग्रेस मार्क देण्यात येणार असून कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाच हे ग्रेस मार्क लागू होणार आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे १० टक्के ग्रेस मार्क देण्यात येत आहेत. यंदाही ग्रेस मार्क लागू करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला असून आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षात परीक्षा देता न आल्याने यावर्षीही १० टक्के ग्रेस मार्क देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
३१ मार्च पासून सुरु होणाऱ्या दहावी परीक्षेसाठी एकूण ८.४२ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यभरात एकूण ३३०५ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून या काळात निवडणूक असल्याने बंदोबस्तासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना आधीच कळविण्यात आले आहे.
परीक्षा काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून कोणत्याही अफवांवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये,असेही रामचंद्र यांनी सांगितले.