बेळगाव लाईव्ह : १९ मार्च रोजी येळ्ळूर येथील राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे शुद्धीकरण आणि दुग्धाभिषेक करण्यासाठी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून मागील आठवडाभरापासून या सोहळ्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
मूर्तीच्या शुद्धीकरणासाठी सात नद्यांचे पाणी आणण्याचा निर्णय झाला असून या अनुषंगाने आज येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी कोल्हापूर येथील पाच नद्यांचा संगम असलेल्या पंचगंगा नदीचे पाणी आणण्यासाठी रवाना झाले आहेत.
सकाळी ७.०० वाजता पंचगंगा नदीवर जलपूजन आणि कलश पुजनाने छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयघोषात श्री क्षेत्र नरसोबावाडी येथे कूच केली. त्यानंतर नरसोबावाडी येथील पंचगंगा, वारणा आणि कृष्णा नदी
तिहेरी संगमावर विधिवत पूजा करून गुरूदेव दत्तांचा आशिर्वाद घेऊन दुधगंगा,वेदगंगा नद्यांचे पाणी घेऊन बेळगावला परतले. यानंतर खानापूर येथील मलप्रभा नदीचे पाणी देखील आणण्यात येणार आहे.
या मोहिमेत येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, सरचिटणीस प्रकाश अष्टेकर, उपाध्यक्ष राजु पावले, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, दता उघाडे आदींचा समावेश होता.