आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वीजदर वाढ होणार नाही अशी अपेक्षा असताना येत्या 1 एप्रिल 2023 पासून विज बिल दरात वाढ होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना वीज दरवाढीचा झटका बसणार आहे.
आर्थिक नुकसान होत असल्याचे कारण देत हेस्कॉम, बेस्कॉम आदी वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी दर वाढवून देण्याची मागणी सरकारकडे केली होती. प्रति युनिट वाढवल्या जाणाऱ्या दराबाबत ग्राहकाकडून आक्षेप देखील मागवण्यात आले होते.
आक्षेप नोंदणीनंतर अलीकडेच कांही दिवसापूर्वी हुबळी येथे बैठक पार पडली. या बैठकीत वीज कंपनी केलेल्या मागणीनुसार केइआरसीने सुधारित वीजदर वाढ लागू करण्याची परवानगी दिली आहे.
सदर परवानगी मिळाल्यामुळे येत्या 1 एप्रिलपासून नवीन दर लागू केले जाणार आहेत. प्रति युनिट 1 ते 1.50 रुपयापर्यंत दर वाढवून द्यावा अशी मागणी हेस्कॉमसह इतर कंपन्यांनी केइआरसीकडे केली होती. मात्र दर किती प्रमाणात वाढविणार आहे? याची अधिकृत माहिती देण्यात आलेले नाही. तथापि येथे आठ दिवसात सुधारित दर जाहीर केले जाणार आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
एकंदर येत्या एप्रिलपासून दरवाढ होणार हे निश्चित आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक आणि दरवाढ याचा कोणताही संबंध नसल्याचे दिसून आले आहे. मात्र दरवर्षी वीजदर वाढ होत असल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.