बेळगाव लाईव्ह : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी नुकतीच बैठक घेऊन मतदारांना आमिष देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे गिफ्ट, कुपन, जेवणाचे कार्यक्रम यासारख्या गोष्टी न राबविण्याचे सक्त आदेश दिले आहेत.
मात्र तरीही ग्रामीण मतदार संघासह शहरात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम पार पाडले जात असून याठिकाणी मतदारांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसने विविध ठिकाणी असे उपक्रम हाती घेतले असून आज ग्रामीण मतदार संघातील विविध गावात काँग्रेस प्रणित कुपन्स वाटण्यात आली आहेत. हे कुपन घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होत असून या कूपनमध्ये दर महिन्याला प्रत्येक घरातील महिलेला २००० हजार रुपये, गॅस सिलिंडरसाठी ५०० रुपये, २०० युनिट मोफत वीज, १००० रुपये महागाई भत्ता यासारख्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.
या कूपनवर मतदारांनी आपली माहिती भरून पुन्हा संबंधित काँग्रेस प्रतिनिधीकडे द्यावयाचे आहे. कंग्राळी खुर्द या भागात महिलांनी हे कुपन घेण्यासाठी सकाळपासून लांबच्या लांब रांगा लावल्या असून हि गर्दी पाहता एखाद्या यात्रेचे स्वरूप आल्यासारखे वाटत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात कडक निर्देश दिल्यानंतरही ग्रामीणसह दक्षिण मतदार संघात देखील असे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडपणे सुरु असून यावर जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान बेळगाव तालुक्यातील ग्रामीण विधानसभा मतदार संघात येणाऱ्या संतीबस्तवाड गावात १५ मार्च रोजी रात्री ९.०० च्या सुमारास एससी-एसटी मेळाव्याच्या नावाखाली मतदारांना आमिष देण्याच्या उद्देशाने ३००० हजार लोकांना एकत्रित आणण्यात आले होते.
या मेळाव्यात मांसाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. हि बाब निदर्शनात येताच निवडणूक अधिकाऱ्यांनी याठिकाणी जाऊन तेथील स्वयंपाकाची भांडी जप्त केली आहेत दुसरीकडे कूपन वाटपाच्या ठिकाणी धाड मारावी कारवाई करावी अशी मागणी वाढू लागली आहे.