बेळगाव लाईव्ह : कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक जाहीर झाली असून इच्छुकांसह कॅन्टोन्मेंट बोर्डानेही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. कर्नाटकातील एकमेव कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणून ओळख असलेल्या बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील मतदारांची संख्या घटली असून कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात केवळ ९३२५ इतकी मतदार संख्या आहे. यंदा २३६२ इतकी मतदार संख्या घटली असून नव्या मतदारांची नोंद झाल्यानंतर हि संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत गतवर्षी मतदार संख्या ११,५८७ इतकी होती. बोर्डातर्फे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात मतदार यादी प्रसिद्ध केली जाते. याप्रमाणे २०२२ ची मतदार यादी प्रसिद्ध केली. मात्र, आता निवडणुकीचे पडघम वाजले असल्यामुळे मतदार यादीत नाव नोंद करण्याच्या सूचना केल्या आहेत.
त्यामुळे मतदार संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्राची लोकसंख्या सुमारे २५ हजार असून काहीजण कॅण्टोन्मेंट हद्द सोडून इतरत्र स्थायिक झाले आहेत. मृत व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळली असून नव्या मतदारयादीनुसार ९,३२५ मतदारांची नोंद आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत एकूण सात प्रभाग असून सर्वाधिक मतदार प्रभाग सातमध्ये आहेत. तर सर्वात कमी मतदार प्रभाग तीनमध्ये असून तिथे ८२८ मतदार आहेत. प्रभाग एकमध्ये मिलिटरी वसाहत असल्यामुळे या प्रभागातील मतदारांची संख्या कमी-जास्त होते. बोर्डातर्फे दरवर्षी एप्रिलमध्ये मतदार यादी दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केली जाते. १ जुलैला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाते.
यानंतर २० दिवसांत मतदारांना तक्रार नोंदविण्याचा कालावधी दिला जातो. त्यानंतर १५ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाते. यानुसार २०२२ मध्ये मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. बोर्डाच्या चार वर्षांच्या काळातील मतदारसंख्येचा विचार केल्यास २०१९ मध्ये १०,२३५ मतदार होते.
तर २०२० मध्ये ९,८०५, २०२१ मध्ये ११,५८७ तर २०२२ मध्ये ९,३२५ मतदार होते. प्रभाग क्रमांक १ मध्ये १३८०, २ मध्ये १२१३, ३ मध्ये ८२८, ४ मध्ये १३४३, ५ मध्ये १५३३, ६ मध्ये १४३० आणि प्रभाग क्रमांक ७ मध्ये १५९८ अशा एकूण ९३२५ मतदारांची नोंद करण्यात आली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक ३० एप्रिलला होणार असल्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची सूचना केली आहे. २ मार्चपर्यंत अर्ज घेण्याच्या सूचना केल्या असून १६ मार्चपर्यंत मतदार यादीत समाविष्ट केलेली नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत. यामुळे मतदार संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. निवडणुकीनंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा मतदार यादी बनविण्याची शक्यता आहे.