बेळगाव शहरातील उपद्रवी मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर झाल्यामुळे त्यांना पकडून शहरावर सोडण्याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला असून कुत्र्यांच्या समस्येसंदर्भात महापौर शोभा सोमनाचे यांनी काल शुक्रवारी आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्या सोबत चर्चा केली.
महापौरांसोबत झालेल्या बैठकीत डॉ. डुमगोळ यांनी मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेची माहिती दिली. सध्या निर्बीजीकरण हा एकमेव पर्याय महापालिका समोर असून या मोहिमेचा वेग वाढवून पिंजऱ्यांची संख्या वाढवायला हवी. शस्त्रक्रियागृहातील सुविधा वाढवायला हव्यात मोकाट कुत्री पकडण्यासाठी कायमस्वरूपी पथक नियुक्त करायला हवे, असे डाॅ. डुमगोळ यांनी बैठकीत महापौरांना सांगितले.
बेळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहीम गेल्या डिसेंबर 2019 मध्ये बंद झाली होती. त्यानंतर शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर झाली होती. त्यावेळी महापालिकेने शहरातील मोकाट कुत्री पकडून जंगलात सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याला श्वानप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींकडून विरोध झाल्यामुळे महापालिकेला तो निर्णय रद्द करावा लागला होता. सध्या महापालिकेत लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आल्यामुळे मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी वाढीव निधी मंजूर करणे शक्य आहे.
पुढील आठवड्यात महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर केले जाणार आहे. तथापि नागरिकांवर हल्ला करणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सध्या होत असली तरी कुत्र्यांना मारणे त्यांना जंगलात सोडणे हा पर्याय नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
एकंदर मोकाट कुत्र्यांना पकडून बाहेर सोडण्याचा विचार सुरू असला तरी त्याची अंमलबजावणी करणे महापालिकेला कठीण जाणार असे वाटत आहे.