कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी (डीसी) व जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पोलीस प्रमुख (एसपी) डाॅ. संजीव पाटील यांनी आज विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन त्या ठिकाणच्या मूलभूत सोयी सुविधांची पाहणी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी, कौजलगी, मुडलगी, घटप्रभा, शिंदीकुरबेट, गोकाक, बेल्लद बागेवाडी, उळागड्डी खानापूर आदी ठिकाणच्या मतदान केंद्रांना आज जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. संजीव पाटील यांच्या समवेत भेट दिली. या भेटीप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी सदर मतदान केंद्राच्या ठिकाणी असलेल्या मूलभूत सोयी सुविधांची माहिती घेऊन पाहणी केली.
तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचीनुसार मतदान केंद्रांच्या ठिकाणी आवश्यक किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केली.
मतदानासाठी येणाऱ्या मतदारांची गैरसोय होऊ नये याकडे लक्ष पुरविण्यात यावे. त्या अनुषंगाने पिण्याच्या पाण्याच्या सोयीसह स्वच्छतागृह शौचालयांची व्यवस्था केली जावी. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर वगैरे आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणे जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. संजीव पाटील यांनी मतदान केंद्राची सुरक्षा आणि पोलीस बंदोबस्ताच्या अनुषंगाने पाहणी करून उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. याप्रसंगी स्थानिक तहसीलदारांसह संबंधित अन्य खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.