बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता बुधवार पासून लागू होत असल्याने सार्वजनिक ठिकाणावरील सर्व पोस्टर्स, बॅनर, भित्तिचित्रे काढून टाकण्यात यावीत.
निवडणूक कर्तव्यासाठी नेमलेल्या सर्व पथकांनी तातडीने कामाला लागावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणूक अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी, मतदान केंद्रांवर किमान पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासह संबंधित मतदान केंद्राच्या सेक्टर अधिकार्यांनी मतदान केंद्राना अनिवार्य भेट देऊन तेथील पायाभूत सुविधांची खात्री करावी तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे आढळल्यास तत्काळ कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. रोख रक्कम, दारू, भेटवस्तू आणि इतर वस्तूंच्या अवैध वाहतुकीवर कडक दक्षता ठेवावी.
अशा अवैध वाहतुकीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या वस्तूंवर कोणत्याही पक्षाचे किंवा व्यक्तींचे छायाचित्र असल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. पोर्ट्रेट किंवा पक्षाचे चिन्ह सापडल्यावर संबंधित व्यक्तीला प्रथम आरोपी, वाहनचालक व इतर व्यक्तींना दुसरा व तिसरा आरोपी बनवून कडक कारवाई करण्यात यावी, याचप्रमाणे निवडणूक प्रचार कार्यक्रमांसह विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी सुविधा सुरू करावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे पहिले २४ तास महत्त्वाचे असून संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून आवश्यक माहिती द्यावी. सर्व पर्यटक खोल्या स्वच्छ करून संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द कराव्यात. कोणत्याही कारणास्तव अनधिकृत व्यक्ती किंवा मेळाव्यास परवानगी देऊ नये. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करावी असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ.एम.बी.बोरलिंगय्या म्हणाले की, आचारसंहितेच्या काळात अवैध रोकड, दारू व इतर वस्तूंच्या वाहतुकीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. चेकपोस्टवर वेगवान तपासणी करण्यात यावी, वाहनांची व्यवस्थित तपासणी करावी, अशा सूचनाहि त्यांनी दिल्या. यावेळी, डॉ. बोरलिंगय्या यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परवाना देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी, निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त अधिकारी तसेच कमर्चाऱ्यांना ओळखपत्र परिधान करणे आवश्यक असल्याचे सांगितले. निवडणूक आणि निवडणूक प्रचाराशी संबंधित खोट्या बातम्या आढळून आल्यास, निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्काळ त्याची नोंद करावी. चेकपोस्टवर नेमलेल्या पथकांवर बारकाईने लक्ष ठेवावे, असे सांगितले. यावेळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनीही आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला विविध मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी, विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.