बेळगाव लाईव्ह : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यास १० एप्रिलपर्यंत मुदत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
दिव्यांग मतदार आणि ८० वर्षांवरील मतदारांना घरबसल्या मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पावले उचलण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन केले पाहिजे. परवाना घेतल्याशिवाय कोणताही निवडणूक प्रचार कार्यक्रम करता येणार नाही. पोस्टर, बॅनर आणि भित्तिचित्र लावण्याची परवानगी नाही.
तसेच प्रचारासाठी संबंधित मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी. विविध प्रकारच्या परवानग्या जारी करण्यासाठी एक खिडकी व्यवस्था राबविली जाईल, संपूर्ण जिल्ह्यातील अठरा मतदारसंघांसाठी एकच परवानगी आवश्यक असल्यास जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज करता येईल. एखाद्या विशिष्ट मतदान केंद्रासाठी परवानगी आवश्यक असल्यास संबंधित मतदान केंद्राच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून परवानगी घेता येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील यांनी, प्रत्येक पक्ष व उमेदवाराला समान संधी मिळणार असून दुसर्या पक्षाच्या प्रचारात अडथळा न आणता काम केले पाहिजे, असे सांगितले. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. शिवाय विनापरवानगी मोहीम राबविल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मतदारांना आमिष दाखविल्यास किंवा धमकावले जात असल्याचे आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ.एम.बी.बोरलिंगय्या यांनी दिला.या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.