बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून या निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोग पुढील आठवड्यात अधिसूचना जाहीर करण्याची शक्यता आहे.
राज्याच्या सहमुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत संकेत दिले असून निवडणुकीच्या घोषणेबाबत केंद्रीय निवडणूक आयोग २७ किंवा २८ मार्चला दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन घोषणा करेल, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
राज्याच्या सहमुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगर, निगम, महामंडळांचे आयुक्त म्हणून काम करणाऱ्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाची कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
याशिवाय आचारसंहिता तयार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचा संदेश पाठवण्यात आला आहे. एप्रिल, मेमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी जाहीर होईल. त्यामुळे निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करा, तसेच निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.
तत्पूर्वी, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी तीन दिवसांचा दौरा करून प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांशी निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली. यानंतर त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश दिले. विशेषतः मतदारांना आमिष दाखविणाऱ्या विरोधात कडक पावले उचलण्याचा इशारा दिला होता.
आता कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यासाठी सर्व तयारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य विधानसभेच्या निवडणुका एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याची शक्यता आहे.