बेळगाव शहराचा योग्य प्रकारे विकास व्हावा यासाठी स्थानिक जाणकार नागरिकांचा समावेश असलेल्या प्रभाग समित्या स्थापन करण्यात याव्यात, अशी विनंती वजा मागणी बेळगावी वार्ड समिती बळग या संघटनेतर्फे महापौर, उपमहापौर आणि मनपा आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.
अलीकडच्या काळातील एकंदर परिस्थिती पाहता बेळगाव शहरातील विभिन्न प्रभागांमधील अनुभवी जाणकार नागरिकांनी शहराच्या विकासात हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने विविध प्रभागातील 15 हून अधिक नागरिकांनी एकत्रित येऊन ‘बेळगावी वाॅर्ड समिती बळग’ ही संघटना स्थापन केली आहे.
या संघटनेतर्फे गौरी गजबर आदींच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील आणि महापालिका आयुक्तांच्या नावे सहाय्यक उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांना उपरोक्त विनंती वजा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदनात स्थानिक नागरिकांचा समावेश असलेल्या प्रभाग समित्या स्थापन केल्यामुळे गैरप्रकारांना आळा बसून होणारे फायदे, जनतेचा प्रशासनावरील विश्वास वाढण्यास होणारी मदत, योग्य प्रकारे होऊ शकणारा शहराचा विकास वगैरे बाबी नमूद करण्यात आल्या.
असून युद्धपातळीवर प्रभाग समित्या स्थापन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जावी, अशी विनंती करण्यात आली आहे.