Saturday, December 21, 2024

/

शहरात भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर?

 belgaum

बेळगाव शहरात परराज्यातील लहान मुलांकरवी भीक मागण्याचा काळा धंदा चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली असून एका सेवाभावी संस्थेची जागरूकता याला कारणीभूत ठरली असून त्या रॅकेटला गजाआड करण्यासाठी पोलीस यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे.

याबाबतची माहिती अशी की, सीबीटी बस स्थानकाच्या ठिकाणी दोन मुले भीक मागत आहेत आणि त्यापैकी एका लहान मुलाच्या पायांना भाजल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे त्या मुलाला उपचाराची गरज असल्यामुळे आपण मदत करावी, असा फोन एका पोलिसाने सेवाभावी संस्था सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनला दिली. सदर माहिती मिळतात फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी सीबीटी येथे जाऊन त्या मुलांची भेट घेतली.

त्यावेळी त्यांनी केलेल्या चौकशीत संबंधित मुलांनी आपण मूळचे अकबरपुर -जौलपूर उत्तर प्रदेश येथील असल्याचे आणि आपल्या भाजलेल्या पायावर उपचार करण्यासाठी आपण भीक मागत असल्याचे सांगितले. जखमी मुलाला पाय कसे काय भाजले? अशी विचारना केली असता. शेकोटी समोर बसलो असताना एकाने मला शेकोटीत ढकलले त्यामुळे माझे पाय भाजले असेल त्याने सांगितले. शेकोटीत ढकलल्यास शरीराचा समोरील भाग भाजला जावयास हवा.

तथापि त्या लहान मुलाची मांडीच्या आतील बाजूने पोटऱ्यापर्यंतची त्वचा जळालेली होती. तसेच तो मुलगा गावाकडे आपण भाजलो गेलो असे सांगत असला तरी भाजलेली जखम अलीकडची ताजी दिसत होती. त्यामुळे संशयावरून सुरेंद्र अनगोळकर त्या मुलांकडे अधिक चौकशी केली असता आपण आपल्या काका काकू समवेत येथे आलो आहोत. आमच्यासोबत आणखी दहा मुले असून सर्वांचे आई-वडील गावाकडे आहेत अशी माहिती त्या मुलांनी दिली.Beggars cbt

सदर माहिती जाणून घेताच पैसे कमवण्यासाठी संबंधित लहान मुलांना भीक मागण्यासाठी वापरले जात असल्याचे सुरेंद्र अनगोळकर यांच्या लक्षात आले. तेंव्हा त्यांनी तात्काळ तशी माहिती पोलिसांना दिली. तसेच त्या जखमी मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून दाखल केले. दरम्यान पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल होऊन त्या जखमी मुलांची चौकशी केली.

त्यावरून भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर करणारी टोळी शहरात कार्यरत असल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला असून त्याच्या खात्रीसाठी उर्वरित 10 मुलांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस कार्यरत झाले आहेत. त्यामुळे एकंदर बेळगाव शहरात भीक मागण्यासाठी परराज्यातील लहान मुलांचा वापर करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.