बेळगाव लाईव्ह : मंगळवार दि. ७ मार्च रोजी होणाऱ्या रंगोत्सवासाठी तरुणाई सोमवारी सायंकाळपासूनच तयारीला लागली आहे.
डीजेच्या तालावर बेधुंद रंगोत्सव साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी साउंड सिस्टीमची तयारी करण्यात येत असून चव्हाट गल्ली, खडक गल्ली, पांगुळ गल्ली आदी महत्वाच्या ठिकाणी सालाबादप्रमाणे रंगोत्सवाच्या जल्लोषासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. परंपरेनुसार उद्या चव्हाट गल्ली येथील चव्हाटा देवस्थानासमोर रंगोत्सव आणि वार्षिक होळी उत्सव तसेच पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिर समोर सामूहिक लोटांगण, गोंधळी गल्ली येथील वेताळ देवस्थानात पूजा आणि सालाबादप्रमाणे गुंजेनट्टी येथे होळी कामाण्णा मंदिर यात्रा पार पडणार आहे.
रंगोत्सवासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत असून रंगोत्सवाच्या आधीच एक दिवस बच्चेकंपनी आणि तरुणाईला रंगोत्सवाचे वेध लागले आहेत. मंगळवारी शाळांना सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांनी सोमवारीच रंगपंचमीचा आनंद लुटला. अनेक रिक्षा मामांनी विद्यार्थ्यांसमवेत रंगोत्सवाचा आनंद लुटला.
शहर – परिसरात विविध ठिकाणी असलेल्या होळी कामाण्णा मंदिरासमोर होलिका दहनाची व्यवस्था करण्यात आलेली पाहायला मिळाली. सोमवारी सायंकाळपासूनच टिमक्यांचा आवाज, विविध ठिकाणी उभारण्यात आलेले रंगोत्सवाच्या साहित्याचे स्टॉल्स आणि नागरिकांची गर्दी यामुळे रंगोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले.
कोरोना कालावधीत सलग दोन वर्षे रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध होते. मात्र मागील वर्षीपासून पुन्हा सर्व सण – उत्सव पूर्ववत साजरे करण्यात येत असून यंदा मात्र पूर्ण जल्लोषात रंगोत्सव साजरी करण्याची तयारी तरुणाईने केलेली पाहायला मिळाली.
शहरात अनेक ठिकाणी मैदानावर रंगोत्सवासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रंगपंचमी काळात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त देखील तैनात केला आहे.