Wednesday, November 27, 2024

/

पूर्वापार चालत आलेली होळीची परंपरा जपणारी चव्हाट गल्ली

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील १८ प्रमुख गल्ल्यांपैकी प्रमुख मानल्या जाणाऱ्या आणि सरपंचपदाचा मान असणाऱ्या चव्हाट गल्लीत होळी उत्सवाची अनोखी आणि पूर्वापार चालत आलेली परंपरा आजही तितक्याच भक्तीने जपली जात आहे. आज सालाबादप्रमाणे चव्हाट गल्ली येथे होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

धुलीवंदनाच्या आधी एक दिवस होळी पौर्णिमेला सजविलेल्या गाड्यातून होळी कामाण्णा आणि होळीसाठी लागणारी संगी म्हणजेच लाकडे वाजत गाजत मिरवणुकीने चव्हाट गल्ली येथील यात्रास्थळी आणली जातात. चव्हाट गल्ली येथील चव्हाटा देवस्थानाच्या मागील बाजूस हि लाकडे ठेवण्यात येतात. त्यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी वाला (दोरी) च्या साहाय्याने गल्लीतील आबालवृद्धांच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने होळी कामाण्णा उभारण्यात येते. कोलकार समाजातील होळीतील इंगळ आणून प्रथेनुसार पूजाविधी करण्यात येते. जी व्यक्ती कोलकार समाजातून इंगळ पळवून आणेल त्याला गोवऱ्या करण्याचीही प्रथा येथे पाळली जाते. पूर्वापार चालत आलेला हा होळी यात्रेचा वारसा आजची पिढी देखील तितक्याच श्रद्धेने जोपासत आहे.

बेळगाव शहरातील सर्वात शेवटी होलिका दहन करणाऱ्या चव्हाट गल्लीतील होळीची इंगळ भडकल गल्ली, कामत गल्ली येथील होलिका दहनासाठी वापरण्यात येते, अशी देखील प्रथा आहे. यानंतर लोटांगण कार्यक्रम, सायंकाळी अक्षतारोपण आणि पूजाविधी नंतर नारळ फोडण्यात येतो.Chavat galli holi

मनाचा नारळ फोडल्यानंतर मुख्य यात्रेला सुरुवात होते. याठिकाणी उभारण्यात आलेल्या होळी कामण्णा वर नारळ उडविण्याची प्रथादेखील पूर्वापार चालत आली आहे. अनेक भाविक चव्हाटा देवस्थानात नवस बोलतात. आणि हा नवस फेडण्यासाठी येथील होळी उत्सवादरम्यान नारळ फोडण्याची प्रथादेखील पाळण्यात येते.

साधारण सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सुरु झालेली हि यात्रा रात्री ११ पर्यंत हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरु असते. भाविकांच्या गर्दीमुळे या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. बेळगावमधील १८ गल्ल्यांच्या सरपंचपदाचा मान असणाऱ्या चव्हाट गल्लीत आजही हि प्रथा परंपरेनुसार पाळण्यात येत असून नव्या पिढीचाही या यात्रेत मोठा सहभाग असलेला पाहायला मिळतो.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.