बेळगाव शहरातील मानाची देव दादा सासनकाठी आज सोमवारी रात्री 9 वाजता चव्हाट गल्ली येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान देवघर येथून बैलगाडी आणि भाविकांचा मोठा सहभाग असणाऱ्या पायी दिंडीने श्री ज्योतिबा डोंगराकडे रवाना होणार असल्याची माहिती चव्हाट गल्ली येथील प्राचार्य आनंद आपटेकर यांनी दिली.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून चव्हाट गल्ली येथून श्री जोतिबा डोंगरावर सासनकाठी घेऊन जाण्याची परंपरा असून आज सोमवारी सायंकाळी चव्हाट गल्ली येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान देवघर येथे विधिवत पूजा विधी करून भाविक सासनकाठी सोबत डोंगराकडे रवाना होणार आहेत. उद्या मंगळवारी संकेश्वर येथे, बुधवारी 29 रोजी सौदलगा तर गुरुवारी 30 मार्च रोजी गोकुळ शिरगाव येथील पंचगंगा नदीच्या तीरावर पायी दिंडीचा मुक्काम असेल.
त्यानंतर 1 एप्रिल रोजी 2023 मानाच्या देवदादा सासनकाठीसह ही दिंडी डोंगराच्या पायथ्याशी पोहोचेल. तेथून सजावट करून वाजत गाजत ती डोंगरावर पोहोचेल. दक्षिण दरवाजा येथे डोंगरावरील पुजारी या मानाच्या सासनकाठीला पानविडा नारळ देऊन डोंगरावर स्वागत करणार आहेत. त्यानंतर देवदर्शन घेऊन सासनकाठी व भाविक बेळगावकरांची हक्काची जागा असलेल्या ठिकाणी पाच दिवस यात्रेसाठी वास्तव्य करणार आहेत.
श्री जोतिबा डोंगरावरील यात्रा काळात सायंकाळी देवाचा पालखीचा सोहळा म्हणजे ‘सविनयचा सोहळा’ या सोहळ्यात बेळगावची श्री देवदादा सासनकाठी सहभागी होईल. यात्रेचा मुख्य दिवस हा 5 एप्रिल असून मुख्य पालखी सायंकाळी 5 वाजता बाहेर पडणार आहे. देवदादा शासनकाठी पौर्णिमेच्या मध्यरात्री डोंगरावरून परतीचा प्रवास सुरू करणार आहे.
कागल येथे 6 एप्रिल रोजी, स्तवनिती घाट येथे 7 एप्रिल रोजी, हत्तरगी येथे 8 एप्रिलला काकती येथे 9 एप्रिल रोजी आणि देव दादा मठ शिवबसवनगर येथे 10 एप्रिल रोजी यात्रा पार पडणार आहे. याप्रसंगी सुमारे 25000 भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य आनंद आपटेकर यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना दिली.