आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाने संतीबस्तवाड येथे एका जेवणावळीवर छापा मारल्यानंतर आता गोकाक विधानसभा मतदारसंघातील यद्दलगुड तपासणी नाक्यावर एका वाहनातून 3.5 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन संभाव्य उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करण्यासंबंधी माहिती देण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी नाके सुरू केले आहेत. या ठिकाणाहून ये -जा करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा मद्य साठा आणि पैशाची वाहतूक केली जाते. गोकाक विधानसभा मतदारसंघातील यद्दलगुड तपासणी नाक्यावर पोलिसांनी संशयावरून केए 22 एमएल 8728 क्रमांकाच्या वाहनाची निवडणूक अधिकाऱ्यांसमोर झेडती घेतली. या झडतीमध्ये वाहनात 3 लाख 50 हजार रुपयांची रोकड आढळून आल्याने ती जप्त करण्यात आली. या रकमेचे मालक लक्ष्मण हनमंत गडाद (रा. मन्निकेरी) हे आहेत. जप्त करण्यात आलेली रोकड ट्रेझरी कार्यालयातील सुरक्षा कोठडीत ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या 15 मार्च रोजी रात्री बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड येथे एका जेवणावळीवर निवडणूक भरारी पथकाने छापा टाकला होता. याप्रकरणी अखेर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून नागेंद्र बाळाप्पा नाईक (रा. संतीबस्तवाड) आणि अन्य एक जण अशा दोघांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल झाला आहे.